FIFA World Cup 2022: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित फिफा विश्वचषक २०२२ चं उद्घाटन कतारमध्ये झालं आहे. नुकत्याच झालेल्या ग्रँड ओपनिंग सोहळ्याने सर्वाचे डोळे दिपवले. फिफा वर्ल्डकप, जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि यासाठी सगळेच क्रीडाप्रेमी खूप उत्सुक आहेत. फुटबॉल विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेच्या देशात आयोजित केला गेला आहे. तसेच फिफा विश्वचषक प्रथमच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात खेळवला जात आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण ३२ देशांचे संघ सहभागी झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रँड ओपनिंग सोहळ्यात प्रसिद्ध BTS बँडचा सदस्य जुंग-कूकच्या गाण्याने ‘चार चाँद’ लावले.
फिफा विश्वचषक स्पर्धेचे अधिकृत गीत सादर करणारा जुंग-कूक हा पहिला आशियाई गायक ठरला आहे. यापूर्वी शकीरा आणि एनरिक इग्लेसियस यांसारख्या कलाकारांना हा सन्मान मिळाला आहे. गायक जिओन जुंग-कूक हा जुंग-कूक म्हणून ओळखला जातो, तो दक्षिण कोरियाचा पॉप गायक आहे. दक्षिण कोरियन बँड BTS चा सर्वात तरुण सदस्य आणि गायक असलेला जुंग-कूक उद्घाटन समारंभात गाणार असल्याची घोषणा वर्ल्ड कप २०२२ च्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आली होती.
जुंग-कूकने आपल्या ‘ड्रीमर’ या गाण्याच्या तालावर सर्वांना नाचायला भाग पाडले. जुंग-कूक या नावाने प्रसिद्ध असलेल्या जिओन जंग-कूकने आपल्या धमाकेदार सादरीकरणाने सर्वांची मनं जिंकली. के-पॉप बँड BTS च्या जंग-कूकने कतारी गायक फहाद अल-कुबैसीबरोबर फिफा विश्वचषक स्पर्धेचे अधिकृत गीत सादर केले. ड्रीमर्स या गाण्याला फुटबॉल चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या गाण्याच्या तालावर फुटबॉल चाहतेही थिरकताना दिसले.
दरम्यान फिफा विश्वचषकाचं प्रसारण भारतातील टीव्ही चॅनेल्स ‘स्पोर्ट्स १८’ आणि ‘स्पोर्ट्स १८ एच डी’वर करण्यात येत आहे. तसेच जिओ सिनेमा अॅप आणि त्याच्या वेबसाइटवर सामन्यांचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. उद्घाटन सोहळ्याचा पहिला सामना कतार विरुद्ध एक्वाडोर यांच्यात खेळवला जात आहे.
