‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ फेम प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन आणि ख्रिस मार्टिन यांचं ब्रेकअप झालं आहे. सूत्रांनी बुधवारी पीपलला दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्यांनी कायमचं वेगळं व्हायचं ठरवलं आहे. आठ वर्षांपासून दोघे एकत्र होते, मध्यंतरी त्यांचं ब्रेकअप झालं होतं, पण नंतर समेट झाली होती. आता मात्र, दोघांनी हे नातं कायमचं संपवलं आहे.

वयातील अंतर व मुलं ही त्यांच्या विभक्त होण्याची मुख्य कारणं आहेत, अशी माहिती द यूएस सनने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. डकोटा ३५ वर्षांची आहे, तर ख्रिस ४८ वर्षांचा आहे. “डकोटाला आयुष्यात स्थिरावायचं होतं, पण ख्रिस मात्र नेहमी कामात व्यग्र असायचा, दोघेही वेगळे व्हायचे तेव्हा ती प्रचंड रडायची,” असे त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले.

डकोटाला आई व्हायचं होतं, पण ख्रिसला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. त्यामुळे त्याला मुलं नको होती. “ती त्याच्यावर आणि त्याच्या मुलांवर खरोखर खूप प्रेम करते आणि तो तिच्यावर खूप प्रेम करतो, परंतु काही गोष्टींमध्ये त्यांचं एकमत होत नव्हतं आणि त्यामुळे खूप चढ-उतार येत होते,” असं सूत्रांनी सांगितलं.

वयातील अंतर ठरलं ब्रेकअपचं कारण

“त्यांनी एकत्र काही सुंदर आठवणी तयार केल्या, पण खूप चढ-उतार आले. त्यांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु वयातील अंतर ही मोठी समस्या होती. एवढी वर्षे नात्यात राहिल्यानंतर आयुष्यात पुढे जाणं दोघांसाठीही कठीण आहे, पण दुसरा पर्याय नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली. दोघेही येत्या काळात आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करणार आहेत.

एका मुलाखतीत डकोटाने ख्रिस व त्याच्या मुलांबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. “मला ती मुलं खूप आवडतात कारण माझे आयुष्य त्यावर अवलंबून आहे,” असं ती म्हणाली होती. तिला मातृत्वाबद्दलही विचारण्यात आलं होतं. आपण किती काळ जगणार हे माहीत नसतं, त्यामुळे आई होणं माझ्या नशीबात असेल तर मी होईन, असं तिने म्टलं होतं. ख्रिसची पहिली पत्नी, ग्वेनेथने डकोटाच्या ३० व्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. त्यावेळी तिने डकोटाचं खूप कौतुक केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१७ पासून ख्रिस व डकोटा एकत्र आहेत. २०१८ मध्ये अनेकदा ते एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावायचे. दोघांनी सारखेच टॅटूदेखील गोंदवून घेतले होते. २०१९ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं, पण दोन महिन्यांनी परत ते एकत्र आले. तेव्हापासून ते सोबत होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही आल्या होत्या. पण दोघांच्याही टीमने हे वृत्त फेटाळले. कोल्डप्लेचा जानेवारी २०२५ मध्ये भारतात कॉन्सर्ट झाला होता, तेव्हा डकोटा ख्रिसबरोबर भारतात आली होती, दोघांनी पारंपरिक पोशाख परिधान करून बाबुलनाथ मंदिरात दर्शन घेतले होते.