फॉम्र्युलाबाज चित्रपट ही बॉलीवूडची खासियत. चित्रपटाचा पहिला भाग गल्लापेटीवर प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर दुसरा भाग काढणे हे गणित समजण्यासारखे आहे. मात्र, ‘एबीसीडी २’ या चित्रपटात प्रमुख कलावंतांचे नृत्यनैपुण्य आणि एकामागून नृत्याविष्कारांचे दर्शन प्रेक्षकाला घडवत राहणे यापलीकडे चित्रपट खूप काही करू शकत नाही. समूह नृत्य असो की समूहाने पूर्ण करण्याचे काम असो ‘टीम स्पिरीट’ महत्त्वाचे ठरते हे नमूद करण्यात सिनेमा यशस्वी ठरला आहे. हिप-हॉप नृत्य प्रकाराची आवड असणारे आणि नसणारे प्रेक्षकही चित्रपटात रमतील अशी समूह नृत्ये यात आहेत. परंतु, सिनेमा म्हणून खूप काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. भरपूर समूह नृत्याविष्कार आणि नृत्यनैपुण्य दाखविणे हेच या चित्रपटाचे एकमेव उद्दिष्ट ठरते. त्यामुळे डान्स रिअॅलिटी शोचा विस्तार अडीच तास पडद्यावर पाहायला मिळतो.
सुरेश ऊर्फ सुरू आणि विनी हे बालपणापासूनचे मित्रमैत्रीण आहेत. दोघांनाही हिपहॉप नृत्यांची प्रचंड आवड आहे. नृत्यात करिअर करण्याची हौस असली तर दैनंदिन जगणे सुसह्य़ होण्यासाठी जे मिळेल ते काम करतात. सुरू, विनी आणि त्यांचा नृत्य समूह एका स्पर्धेत हरतो, एका ख्यातनाम नृत्यगुरूच्या स्टाइलची नक्कल करण्यावरून त्यांची हेटाळणी केली जाते. मुंबई स्टनर्स हा त्यांचा नृत्यसमूह मग आंतरराष्ट्रीय हिप-हॉप स्पर्धेपर्यंत पोहोचणे आणि त्यात आपले नृत्यनैपुण्य आणि समूहाचा जिगरबाजपणा सिद्ध करून दाखवतात.
चित्रपटाच्या पहिल्या भागा प्रमाणेच विष्णू सर ही भूमिका दुसऱ्या भागात असून प्रभुदेवा यांनीच ती साकारली आहे. वरुण धवनने सुरू ही व्यक्तिरेखा तर श्रद्धा कपूरने विनी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. रूढार्थाने वरुण धवन-श्रद्धा कपूर ही नायक-नायिकेची जोडी असली तरी धर्मेश, छोटू, वेरनॉन, कार्तिक, रघु, विनोद, ऑलिव्ह असा इंडियन स्टनर्स हा आंतरराष्ट्रीय हिप-हॉप स्पर्धेसाठी लास वेगासमध्ये दाखल झालेला समूह हाच चित्रपटाचा नायक आहे असे म्हणता येईल. किंबहुना नृत्य हाच चित्रपटाचा आत्मा आणि गाभा आहे. त्यामुळे समूह नृत्य स्पर्धेत अपेक्षित असलेले ‘टीम स्पिरीट’ दाखविणे हाच काय तो एकमेव उद्देश चित्रपटामागे आहे. नृत्य एके नृत्य दाखविताना लेखक-दिग्दर्शकांनी पटकथेची गुंफण करण्यात आणि नृत्य दिग्दर्शनाव्यतिरिक्त चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात ते अपयशीच ठरले आहेत. नृत्यप्रेमींना त्यातही हिपहॉप नृत्यप्रेमींना खिळवून ठेवण्यासाठी एकामागून एक नृत्याविष्कार म्हणजेच सिनेमा असा एक गैरसमज चित्रपटकर्त्यांचा झालेला चित्रपट पाहताना सतत जाणवते.
त्याचबरोबर जगासमोर स्पर्धेत जाताना ‘आय लव्ह इंडिया’ म्हणत दिखाऊ देशभक्तीचा नारा लगावणे आणि त्यायोगे प्रेक्षकांना भारावून टाकण्याचा प्रकार बॉलीवूडने थांबवायला हवा, असेही हा चित्रपट पाहताना जाणवते.
श्रद्धा कपूरने नृत्यांगना असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी तो खूप यशस्वी ठरलेला नाही. मात्र वरुण धवनने नृत्यकौशल्य दाखविले आहे. एकामागून एक समूह नृत्याविष्कार आणि त्याला जोडून येणारी अगम्य शब्दांतील गाणी रूपेरी पडदा व्यापून उरतात. ‘सिनेमा’ पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या हाती मात्र फारसे काही लागत नाही.
एबीसीडी २
निर्माता – सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक – रेमो डिसूजा
पटकथा – तुषार हिरानंदानी
संवाद – मयूर पुरी
संगीत – सचिन-जिगर
छायालेखन – विजय अरोरा
कलावंत – वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा, धर्मेश येलांडे, लॉरेन गॉट्टिलेब, राघव जुयाल, प्रवीण भोसले, सुशांत पुजारी, प्राची शहा, पुनित पाठक, कार्तिक, टिस्का चोप्रा, प्राची शहा व अन्य.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2015 रोजी प्रकाशित
फक्त नृत्यनैपुण्य..
फॉम्र्युलाबाज चित्रपट ही बॉलीवूडची खासियत. चित्रपटाचा पहिला भाग गल्लापेटीवर प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर दुसरा भाग काढणे हे गणित समजण्यासारखे आहे

First published on: 21-06-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film review of abcd