संजय लीला भन्साळी यांच्या येऊ घातलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली असली तरी या चित्रपटात पद्मावतीची मुख्य भूमिका साकारणारी दीपिका पदुकोण मात्र सातत्याने चर्चेत आहे. तिच्याशी झालेल्या या गप्पा.

* ‘पद्मावती’ हा तुझा आजपर्यंतच्या प्रवासातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे, त्याबद्दल काय सांगशील?
– आजपर्यंतच्या आपल्याकडच्या स्रीप्रधान सिनेमांचं बजेट पाहता हा सिनेमा माझ्यासाठीच नाही तर या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक स्रीसाठी महत्त्वाचा आहे. मी आज अशा ठिकाणी पोहोचले आहे की निर्माते (वायकॉम १८ आणि भन्साळी प्रॉडक्शन्स) माझ्यावर फक्त विश्वासच ठेवत नाहीत तर एका स्त्री व्यक्तिरेखेच्या भोवती फिरणाऱ्या सिनेमात प्रमुख भूमिकेसाठी माझा विचार करतात. मला या गोष्टीचा आजच्या घडीला फार अभिमान वाटतो. मी यापूर्वीही ‘पिकू’सारख्या स्त्रीप्रधान सिनेमात काम केलं आहे. पण ते सिनेमे एवढय़ा प्रचंड बजेटचे नव्हते.

* ‘पद्मावती’ या व्यक्तिरेखेतलं तुला नेमकं काय आवडलं?
– मी ‘पद्मावती’कडे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून बघते. अभिनेत्री म्हणून मला तिच्यामधली कणखर स्त्री आणि तिचं धैर्य महत्त्वाचं वाटतं. मी यापूर्वीही ‘यह जवानी है दीवानी’ (२०१३) मधली नयना, ‘कॉकटेल’मधली व्हेरोनिका (२०१२), ‘बाजीराव मस्तानी’मधली मस्तानी अशा कणखर स्रियांच्या भूमिका केल्या आहेत. या सगळ्याजणी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असणाऱ्या स्त्रिया आहेत. ‘पद्मावती’चंही तसंच आहे. आजच्या पिढीला तिच्या धैर्याशी आपलं काहीतरी नातं आहे, असं वाटू शकतं. असा सिनेमा निर्माण केला जाणं ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. या सिनेमाचं सगळ्यात पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं, त्यातून मला म्हणजे ‘पद्मावती’लाच लोकांपुढे आणलं गेलं. असं काही गेल्या बऱ्याच काळात झालं असेल असं मला वाटत नाही.

* या सिनेमासाठी तुला किती वेळ आणि ऊर्जा घालवावी लागली?
– खूपच. आम्ही ‘बाजीराव मस्तानी’साठी शूटिंग करत होतो त्याच काळात एके दिवशी संजय लीला भन्साळींनी मला विचारलं, की पुढच्या वर्षी तू काय करते आहेस, मी पद्मावतीवर सिनेमा काढण्याचा विचार करतोय, तेव्हा माझ्यासाठी तारखा राखून ठेव. तीनेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ही. आपल्याला हा सिनेमा करायला मिळणार आहे, हे माझ्या मनात तेव्हापासून सुरू झालं. कोणताही सिनेमा करताना तयारीची बरीच मोठी प्रकिया मानसिक असते. माझ्यासाठी उच्चार शिकणं, नृत्य शिकणं हे फार अवघड नाहीय. माझ्यासाठी महत्त्वाचं असतं ते पूर्णपणे व्यक्तिरेखामय होऊन जाणं.

* तुझ्यामधल्या अभिनेत्रीला पद्मावती ही व्यक्तिरेखा साकारताना काय आव्हानाचं वाटलं?
– इतरांना विचित्र वाटलं, पण जेव्हा जेव्हा मी कोणत्याही सिनेमातल्या माझ्या भूमिकेबद्दल बोलते तेव्हा तेव्हा मला ती सगळ्यात अवघड भूमिका आहे असं वाटत असतं. आता पद्मावतीबाबतही मला तसंच वाटतं. मी माझ्या पुढच्या सिनेमावर (सपना दीदी नावाच्या एका गँगस्टरवर दिग्दर्शक विशाल भारद्वाज करत असलेला सिनेमा) फेब्रुवारीपासून काम करायला सुरुवात करीन. प्रत्येकजण मला विचारतो आहे की त्याआधी मी इतकी मोठी सुट्टी का घेते आहे? पण माझ्यासाठी ती फार गरजेची आहे. पद्मावतीसाठी मला खूप शारीरिक आणि भावनिक ऊर्जा ओतावी लागली आहे. मला ती परत मिळवायची आहे. दुसऱ्या भूमिकेत शिरण्याआधी मला परत दीपिका पदुकोण व्हायचं आहे.

* ‘पद्मावती’ सिनेमा त्याच्या निर्मिती प्रक्रियेपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. त्याचा तुझ्यावर किती परिणाम झाला?
-‘पद्मावती’ सिनेमाचा आम्हा सगळ्यांना फार अभिमान वाटतो आहे. तो उत्तमच झाला आहे याची आम्हाला खात्री आहे. जेव्हा तुम्हाला ही खात्री असते, तेव्हा कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही. या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना कलाकार म्हणून आम्ही वेगळ्याच विश्वात होतो. गेल्या महिन्यात या सिनेमाचं काम संपल्यावर मी त्या विश्वातून बाहेर आले आणि मग त्या सगळ्या वादांवर बोलले. (पद्मावतीपासून प्रेरित होऊन रेखाटली गेलेली रांगोळी सूरतमधल्या आंदोलन करणाऱ्या एका गटाने विस्कटली होती, त्यावर दीपिकाने प्रतिक्रिया दिली होती.) मला असं वाटलं की आता किती काळ आम्ही गप्प बसायचं? या देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मनोरंजन व्यवसायाला असं किती काळ वेठीला धरलं जाणार आहे? आम्ही सतत कुणाला ना कुणाला तरी उत्तरदायी आहोत, असं गेला बराच काळ घडतं आहे. प्रेमाची परिभाषा बोलणाऱ्या, सगळा देश बांधून ठेवणाऱ्या सिनेमा व्यवसायावरच नेहमी हे हल्ले का केले जातात ? लोकांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरच का नेहमी घाला घातला जातो? काही लोकांना हवं आहे ते तसंच आपण किती काळ घडू देणार आहोत?

* संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंगबरोबर तुझा हा तिसरा सिनेमा आहे. ‘.रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या पहिल्या दोन सिनेमांमध्ये तू रणवीरच्या प्रेयसीची भूमिका केली आहेस. ‘पद्मावती’मध्ये तुम्ही दोघंही पडद्यावर एकदाही एकत्र दिसत नाही..
– होय, हे थोडं विचित्र आहे खरं. दोन प्रेमकथांमध्ये संजय लीला भन्साळी यांनी आम्हाला एकत्र आणलं आणि आता त्यांनी आम्हाला या वेगळ्या भूमिका दिल्या आहेत. पद्मावतीमध्ये आम्ही अक्षरश: ‘ब्युटी अ‍ॅण्ड बीस्ट’सारखे आहोत.

* तू २०१३ मध्ये ‘चेन्नई एक्स्प्रेस’ केलास आणि २०१४ मध्ये ‘फाइंडिग फॅनी’. तू सिनेमे निवडतेस तरी कसे?
– माझी निवड त्या वेळी मला जे आवडेल त्यानुसार असते. पण मला त्यातली गंमत हरवू द्यायची नसते. दर सहा महिन्यांनी वेगळ्या व्यक्तिरेखेत शिरणं मला खूप थरारक वाटतं. पटकथा निवडतानाही मी त्या वेळी मला काय आवडलं असेल त्यानुसार निवडते. मला मी अमुक इतके सिनेमे केलेत असं नकोय तर मी दर्जेदार सिनेमे केलेत असं हवंय. मला एखादी गोष्ट आवडली नाही तर मी ते काम घेत नाही. माझी ही पद्धत कधीच बदलणार नाही. त्यामुळे एखाद्या वर्षी माझे चार सिनेमे येतील तर एखाद्या वर्षी एखादाच आला असंही होऊ शकतं.

* तुला इंडस्ट्रीत येऊन दहा वर्षे झाली. तुझ्या या प्रवासाबद्दल काय सांगशील?
– मी माझ्यासाठी जो विचार केला होता, त्यापेक्षाही मी खूपच पुढे आले आहे. अर्थात हे घडलं आहे ते माझी माझ्या कामावर असलेली निष्ठा, मी घेतलेली मेहनत आणि माझ्या कामावरच्या समर्पणामुळे. हे सगळं एका रात्रीत घडलेलं नाही. मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या टीमलाच फक्त माहीत आहे की मी किती कष्ट केले आहेत. अर्थात मी हे तक्रार म्हणून सांगत नाहीये. माझं माझ्या कामावर आत्यंतिक प्रेम आहे.

* तुझ्या करिअरला दिशा देणारा सिनेमा कुठला असं तुला वाटतं?
– २००७ मध्ये आलेला ‘ओम शांती ओम’ हा त्यापैकी एक. फार थोडय़ा कलाकारांना पदार्पणातच असा सिनेमा करायला मिळतो. आजही लोक मला शांतीप्रिया म्हणूनच ओळखतात. ‘ओम शांती ओम’नंतर २००९ मधल्या ‘लव्ह आज कल’ने आणि ‘कॉकटेल’नेही माझ्या करिअरला दिशा दिली.

* ‘कॉकटेल’मुळे तुझ्यामधल्या अभिनेत्रीला मान्यता मिळाली. तो त्याआधीच्या काळात तू घेतलेल्या मेहनतीचा परिणाम होता का?
– मेहनत तर सातत्याने करावी लागते आणि खूप करावी लागते. एखादा सिनेमा लोकांना आवडत नाही तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की त्यात मेहनत घेतलेली नाही. या सगळ्यातून मी खूप शिकत गेले आहे. माणूस म्हणून घडत गेले आहे. आणि या सगळ्यातूनच माझ्यातली आजची अभिनेत्री घडलेली आहे.

* सिनेमा व्यवसायात उभं राहण्यासाठी तुला संघर्ष करावा लागला का?
– तो फार कठीण होता असं मी म्हणणार नाही. माझ्याच अशा काही समजुती होत्या की हे असंच असलं पाहिजे, अमुकच पद्धतीने असलं पाहिजे. पण नंतर मला समजलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने वागणं हे सगळ्यात उत्तम असतं. हे मला माझ्या कामातल्या अनुभवांमधून, चढउतारांमधून समजलं आहे. इथे काही ठरावीक साचेबद्ध चौकटी आहेत. पण त्यात स्वत:ला बसवण्यासाठी मी प्रयत्न करण्याची गरज नाही, हेपण मला समजलं.

* तुझं दिसणं तुझ्यासाठी कधी तोटय़ाचं ठरलंय का?
– हो कधी कधी. मी दिसायला चांगली असल्यामुळे काही सिनेमांसाठी मला विचारलं गेलं नाही, असंही मला सांगण्यात आलं. मी ज्याच्याबरोबर बरंच काम केलं आहे, अशा दिग्दर्शकानं मला अनेकदा सांगितलं आहे की तुझं चांगलं दिसणं या दृश्यासाठी मारक आहे. म्हणजे नेमकं काय ते मला कधीच कळलेलं नाही. (पॉझ घेऊन) मला असं वाटतं की ती दिग्दर्शकाची कमतरता आहे. दिग्दर्शकाला जर माझी अभिनयक्षमता माहीत असेल तर त्याला हेही माहीत असायला हवं की त्या व्यक्तिरेखेत शिरण्यासाठी मी माझ्यात आवश्यक ते शारीरिक बदलही करू शकते.

* तुला तुझा खासगीपणा जपायला आवडतं आणि तू खूप बुजरी आहेस, असं तूच नेहमी सांगतेस. मग तुझ्या आयुष्याची जेव्हा सार्वजनिक पातळीवर चर्चा होते तेव्हा तू त्याला कशी सामोरी जातेस?
– मी अशीच आहे. लोकांना माझ्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं हे मी समजू शकते. पण मला ते फार जड जातं. पण त्याच वेळी मी असं क्षेत्र निवडलं आहे, जिथे हे सगळं असणारच आहे. तेव्हा मला त्याच्याशी जुळवून घ्यावंच लागेल. आता मला ते जमतंय, असं मला वाटतं. अर्थात आजही मोठय़ा समारंभांमध्ये मला अवघडल्यासारखं होतंच. पण मी जर संवाद साधू शकले नाही, तर मी अजिबात स्वत:ला ताणत नाही. आणि मला स्वत:ला सोशल मीडियावरून ‘आत्ता माझा मूड कसा आहे’ आणि ‘आज मी नाश्त्याला काय खाल्लं’ हे जाहीर करायला अजिबात आवडत नाही.

* आधीच्या काळात तू तुझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल कधी कधी थोडंफार तरी शेअर करायचीस, पण हल्ली तू ते फार कमी केलं आहेस..
– त्याचा असा काही फॉम्र्युला नाहीय. माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी मला माझ्यापुरत्याच ठेवायच्या आहेत. बाकी जे काही आहे, ते सगळ्यांनाच माहीत आहे. काही गोष्टींबद्दल बोलायचं नाही, असं मी ठरवू शकते, पण बाकी मी काहीच लपवत नाही.

* आपल्या नैराश्याबद्दल जाहीरपणे बोलावं असं तुला का वाटलं?
– मला जेव्हा बरं वाटायला लागलं तेव्हा मला असं वाटलं की माझ्या अनुभवाबद्दल मी इतरांना सांगितलं पाहिजे. त्यातून मानसिक आरोग्याची चर्चा सुरू झाली, हे खूप चांगलं झालं असं मला वाटतं. म्हणजे हा प्रश्न अधोरेखित केला गेला आहे. आजही त्याच्याभोवती असलेले टॅबू तसेच आहेत, ते नाहीसे होण्यासाठी बराच काळ जावा लागेल. पण आता मानसिक आरोग्य दिवस असतो हेही लोकांना लक्षात यायला लागलं आहे.

* पण नैराश्यावर बोलल्यानंतर आता तुला मोकळं वाटतं आहे का?
– होय, आता मला खूप मोकळं वाटतंय. कित्येक महिने मी नैराश्याचं ओझं बाळगलं होतं. मला काय झालं होतं ते मलाच समजत नव्हतं. मी उघडपणे बोलत नसले तरी माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी कशातून गेले आहे, ते माहीत आहे. त्यामुळेच मला असं वाटलं की ज्यांना नैराश्याबद्दल माहीत नाही, अशा लोकांना मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. आपल्या मनात काय सुरू आहे, याचा त्याच्या मनात सततचा संघर्ष सुरू असतो. मी बोलल्यानंतर काही लोकांना तरी नैराश्याची लक्षणं ओळखता येतील. ही लक्षणं ओळखणं मला खूप कठीण गेलं. त्यातून बाहेर येणं हे त्यामानाने सोपं होतं.

* तू जेव्हा एक सिनेमाचं काम संपवून दुसरा सिनेमा करायच्या दरम्यान सुट्टी घेतेस तेव्हा काय करतेस?
– कुटुंबाबरोबर वेळ घालवते. कोणतंही कुटुंब एकत्र आल्यावर जे करतं ते आम्ही करतो. त्यामुळे मला जमिनीवर राहायला मदत होते.

* तुम्ही सगळे एकत्र येता तेव्हा तुम्ही बॅडमिंटन खेळता का?
– माझ्या रॅकेट्सवर आणि शटलवर अक्षरश: धूळ साचली होती. पण अलीकडेच मी पुन्हा खेळायला सुरुवात केली आहे. मी बिल्डिंगच्या खाली संध्याकाळी खेळते.

* तुझ्या घरात बॅडमिंटनची पाश्र्वभूमी आहे. पण तुझी बहीण अनिशा गोल्फर आहे तर तू अभिनयाचं एकदम वेगळं क्षेत्र निवडलंस. तुम्हा दोघींची निवड अशी घरापेक्षा वेगळी कशी झाली?
– आम्ही दोघी वेगळी क्षेत्रं निवडू शकलो कारण आमच्या आई-वडिलांनी आम्हाला त्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी त्यांच्या अपेक्षा आमच्यावर कधीच लादल्या नाहीत. हेच माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांबाबत केलं होतं. आई-वडिलांमुळे आमचं बालपण एकदम साधं, छान, शिस्तशीर होतं. त्या काळातल्या कोणत्याही मध्यमवर्गीय कुटंबात होतं तसंच वातावरण आमच्याही कुटुंबात होतं. मी आणि माझी बहीण आम्ही दोघीही एकमेकींपेक्षा एकदम वेगळ्या आहोत. आमच्या आई-वडिलांनी ते जाणून आम्हाला नेहमी आम्हाला जे करायचं होतं, त्यासाठी प्रोत्साहन दिलं. मला कला क्षेत्रात जायचं होतं. माझ्या आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे मी आज इथे पोहोचले आहे.

* सिनेमा क्षेत्रातल्या इतर लोकांबरोबर तुझी मैत्री आहे. तुझं सोशल लाइफ नेमकं कसं आहे?
– मला नेहमीच सहकार्य करणारे दिग्दर्शक, निर्माते आणि सहअभिनेते मिळाले आहेत. आमच्याबाबतचं एक दुर्दैवी सत्य असं की आम्ही भटक्या जमातींसारखे सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतो. आम्ही एखादा सिनेमा करतो तेव्हा त्या सिनेमाशी संबंधित लोकांबरोबर आमचं बसणं-उठणं सुरू होतं. आमचं एकमेकांबरोबर भावनिक नातं जुळायला सुरुवात होते; तोपर्यंत तो सिनेमा संपतो आणि सगळेजण विखुरले जातात. पुन्हा नवीन सिनेमा आणि पुन्हा तीच सगळी प्रक्रिया.. चांगली गोष्ट अशी की आम्ही सगळे एकमेकांसाठी उभे राहतो आणि संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

* अलीकडेच काही अभिनेत्रींनी त्यांना सामोऱ्या जाव्या लागलेल्या या क्षेत्रातल्या शोषणावर, त्रासावर आवाज उठवला होता. तुला कधी असा त्रास सहन करावा लागला आहे का?
– मी फक्त माझ्याच अनुभवांबद्दल बोलू शकते. मी जेव्हा या क्षेत्राच्या बाहेर होते तेव्हा मला सांगितलं जायचं की बॉलीवूडमध्येदेखील कास्टिंग काऊच होतं. मी अत्यंत सुदैवी आहे की मला असं काही अनुभवावं लागलं नाही. मी या सगळ्यापासून स्वत:ला अत्यंत सुरक्षित ठेवू शकले. पण असं इतरांच्या बाबतीत होत नाही.

* मला तुझ्या रूममध्ये विली हरकोर्ट कूझचं (Willie Harcourt-Cooze) ‘चॉकोलेट बायबल’ हे पुस्तक दिसलं. तू चॉकोलेटप्रेमी आहेस का?
– त्यापेक्षा मला बेक केलेले पदार्थ जास्त आवडतात. मी प्रवासात वाचण्यासाठी नेहमीच अशी पुस्तकं बरोबर ठेवते. सध्या ते घरात हॉलमध्ये आहे. लौकरच ते माझ्या किचनमध्ये जाईल.

(‘द संडे एक्स्प्रेस’च्या ‘आय’ पुरवणीमधून)
अनुवाद – वैशाली चिटणीस
response.lokprabha@expressindia.com
(सौजन्य लोकप्रभा)