२०२४ मधील गाजलेला चित्रपट ‘मार्को’चा मुख्य अभिनेता उन्नी मुकुंदन वादात सापडला आहे. उन्नीवर त्याच्या माजी मॅनेजरने मारहाणीचा व शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात उन्नीचा माजी मॅनेजर विपिन कुमार याने कोची येथील इन्फो पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मातृभूमीच्या वृत्तानुसार, इन्फो पार्क पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत विपिनने दावा केला आहे की उन्नी मुकुंदनने त्याला मारहाण केली आणि शिवीगाळ केली. मॅनेजरने तक्रारीत आरोप केला आहे की फेसबुकवर दुसऱ्या अभिनेत्याचा फोटो पोस्ट केल्याबद्दल त्याला मारहाण करण्यात आली. कोची येथील त्याच्या फ्लॅटच्या पार्किंगमध्ये त्याला मारहाण करण्यात आली. मॅनेजरवर आधी रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि नंतर त्याने पोलिसांत तक्रार दिली अशी माहिती समोर आली आहे.

काय म्हणाला मॅनेजर?

उन्नीबरोबर विपिनने सहा वर्षे काम केल्याचा दावा केला आहे. अभिनेता त्याच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये आला, त्याला फ्लॅटमधून खाली बोलावलं व पार्किंगमध्ये मारहाण केली. एशियानेट न्यूजने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये विपिन म्हणतो, “त्याने माझ्यासाठी अपशब्द वापरले. मी तक्रार दाखल केली आहे. मी त्याच्याबरोबर सहा वर्षे काम करत होतो. त्याने मला बरेचदा त्रास दिला, तरीही मी त्याच्याबरोबर काम केलं. मार्कोनंतर त्याला चांगलं काम मिळालं नाही, तसेच त्याचा अलीकडील चित्रपट ‘गेट-सेट बेबी’ फ्लॉप झाला त्यामुळे तो निराश आहे. सुरुवातीला श्री गोकुलम मूव्हीजने उन्नी दिग्दर्शक म्हणून काम करत असलेल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करण्यास होकार दिला होता, पण नंतर नकार दिला. या सर्व गोष्टींमुळे तो आणखीच निराश झाला आहे. अनेकदा तो त्याची निराशा बोलून दाखवतो. त्याच्या या वागणुकीचा अनेकांना त्रास होतोय, लोक त्याच्यापासून दुरावले आहेत. मी हे सगळं किती काळ सहन करू शकतो?”

टोव्हिनो थॉमसचं कौतुक केल्याने आला राग

विपिनने दावा केला की त्याने टोव्हिनो थॉमसच्या ‘नारिवेट्टा’ चित्रपटाचे कौतुक करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या, त्याचा उन्नीला राग आला. “मी एक प्रमोशन कन्सल्टंट असून १८ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मी इतर चित्रपट आणि कलाकारांसाठी पीआरचे काम देखील करतो. मी सुमारे ५०० चित्रपटांसाठी काम केलंय. नारिवेट्टाच्या प्रमोशनसाठी मी एक पोस्ट केली, ते उन्नीला आवडलं नाही. त्याने मला फोन केला आणि मॅनेजर पदावरून काढून टाकलं. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर तो आला आणि माझ्यावर हल्ला केला,” असं विपिन म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मार्को’ मुळे पॅन इंडिया स्टार झाला उन्नी मुकुंदन

उन्नी मुकुंदनने त्याच्या करिअरमध्ये प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर त्याने तेलुगू व तमिळ भाषेतही सिनेमे केले आहेत. २०११ मध्ये ‘सीडन’ या तमिळ चित्रपटातून त्याने पदार्पण केलं होतं, मग मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं. गेल्या वर्षी आलेल्या ‘मार्को’मुळे उन्नीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. हा चित्रपट भारतातील सर्वात हिंसक चित्रपटांपैकी एक मानला जातो. ३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने ११० कोटी रुपये कमावले होते. हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेतही याला चांगला प्रतिसाद मिळाला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेला त्याचा ‘गेट सेट बेबी’ हा चित्रपट फ्लॉप ठरला. लवकरच तो ‘मिंडियम परांजुम’ मध्ये दिसणार आहे.