सध्या देशभरात ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा विषय आणि त्यात करण्यात आलेले दावे यावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ३२ हजार महिलांचं धर्मांतर करण्यात आल्याचा दावा चित्रपटात करण्यात आला आहे. यावर आक्षेप घेतला जात असताना राजधानी दिल्लीतही अशाच प्रकारे एका महिला मॉडेलवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एएनआयने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिले आहे. यासंदर्भात पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल करून घेतली आहे.
हेही वाचा- कंगना राणौत करण जोहरशी सतत का भांडते? खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली, “तो काही लोकांना…”
मॉडेलने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली असून, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४२ वर्षीय पीडिता ‘मिस इंडिया परफेक्शनिस्ट’ स्पर्धेची विजेती आहे, तर तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेला आरोपी दिल्लीतील लक्ष्मी नगर भागात राहणारा तबलावादक आहे. पीडिता शीख धर्मातील आहे. ती व्यवसायाने मॉडेल असून तिच्या पतीचे निधन झाले आहे. तिला एक मुलगाही आहे. ती तिच्या आईबरोबर राहते.
पीडिता २०१६ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कात आली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी अजमत खान आणि पीडिता हे त्यांच्या कथ्थक नृत्य प्रशिक्षकाच्या माध्यमातून संपर्कात आले. या कनेक्शनमुळेच पीडितेने सोशल मीडियावर आरोपीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. २०१७ पासून त्या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण झाले, असे पोलिसांनी दाखल करून घेतलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
“अजमत खानने दोघांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ काढले असून त्यांच्या आधारे तो माझ्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत होता. मुस्लीम धर्म स्वीकारून त्या धर्माच्या सर्व प्रथा पाळण्यासाठी खान दबाव टाकत होता. त्याला मी नकार दिला. पण अजमतने मला सांगितले की, मला इस्लाम धर्माचा स्वीकार करावाच लागेल. बुरखा घालणे, दिवसातून पाच वेळा नमाज पढणे, रोजा पाळणे या गोष्टी कराव्याच लागतील. पण मी नकारावर ठाम राहिले,” असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
या सर्व प्रकारानंतर पीडितेने लग्नासाठी नकार दिला. २०१८ सालानंतर पीडितेने अजमतबरोबर कोणतेही संबंध ठेवले नाही. तरीही तो तिला धमकी देत होता. सतत फोन करत तो पीडितेला ब्लॅकमेल करत होता. एवढेच नाही, तर आपल्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले नाहीत किंवा बोलणे बंद केले तर आपण गळफास लावून घेऊ, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली होती. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. आरोपी पीडितेला अशीही धमकी देत होता की, जर तिने त्याच्याबद्दल प्रेम कायम ठेवले नाही तर तिचे खासगी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जातील. तिचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी त्याने दिली. आरोपीने पीडित महिलेच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. २०२१ पासून हा प्रकार सतत सुरू होता. अखेर पीडितेने वैतागून हा सगळा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. मात्र, आरोपीने पीडितेचे हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
“आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १७ मेपर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. जेव्हा आरोपी पुन्हा चौकशीसाठी हजर होईल, तेव्हा त्याची सविस्तर चौकशी केली जाईल. त्यानंतर या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याबद्दल नेमके सत्य समोर येऊ शकेल,” अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.