अभिनेता सुबोध भावे मोठ्या तसंच छोट्या पडद्यावरही कायम अॅक्टीव्ह असतो. सोशल मीडियावरूनही तो आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतो. आज सुबोध भावेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याचा आगामी चित्रपट ‘फुलराणी’मधील लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

फुलराणी या चित्रपटात सुबोध भावे विक्रम राजाध्यक्ष ही मुख्य भूमिका साकारणार आहे. नुकताच चित्रपटातील एक मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टमधील त्याला हटके लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच या पोस्टरमध्ये सुबोधसोबत पाठमोरी फुलराणी असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : कुटुंबातील इतर सदस्यांसोबत तुलना करण्यासंदर्भात नागार्जुनचा मुलगा म्हणातो, ‘मला माहितीये…’

फुलराणी चित्रपटात भूमिका साकारण्याविषयी सुबोध म्हणाला, “प्रत्येक भूमिकेने मला वेगळी ओळख दिली. चौकटी पलीकडच्या भूमिका करायला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. ‘फुलराणी’ चित्रपटाची कथा आणि माझ्या भूमिकेची संकल्पना जेव्हा लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशींनी मला ऐकवली, तेव्हा त्यातल्या वेगळेपणामुळे मी लगेचच त्यांना होकार दिला.”

सुबोध भावेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने, ‘फुलराणी या माझ्या नवीन चित्रपटामध्ये आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करतोय. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

‘फुलराणी’ चित्रपटाचे चित्रीकरण करोना काळात पूर्ण झाले आहे. ‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर, १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. विश्वास जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हर्षवर्धन साबळे, जाई जोशी, अमृता राव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फुलराणीची भूमिका कोण साकारणार? आणि इतर कलाकार कोण आहेत? हे सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन जोरात सुरू आहे. उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या साथीने फुलराणीचा मनमोहक सुगंध २०२२ ला चित्रपटगृहात दरवळणार असून ही ‘फुलराणी’ प्रेक्षकांनाही मोहित करेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त केला आहे.