Varun Kapoor and Dhanya Mohan divorce : लोकप्रिय टीव्ही अभिनेता वरुण कपूर आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला आहे. १२ वर्षांच्या लग्नानंतर हे जोडपे वेगळे झाले. दोन आठवड्यांपूर्वी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, वरुण आता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करीत आहे.

वरुणने ‘स्वरागिनी – जोडे रिश्तों के सूर’, ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे आणि संजय लीला भन्साळी यांच्या “गंगूबाई काठियावाडी” या चित्रपटातही काम केले आहे.

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वरुण कपूर आणि त्याची पत्नी धान्या मोहन यांनी दोन आठवड्यांपूर्वीच घटस्फोट घेतला. या जोडप्याने २०१३ मध्ये लग्न केले होते. वरुण किंवा धान्या दोघांनीही अद्याप घटस्फोटाची पुष्टी केलेली नाही.

दरम्यान, काही काळापूर्वी एका मुलाखतीत वरुण कपूर म्हणाला होता, “धान्या नेहमीच प्रवास करीत असते आणि मी नेहमीच शूटिंग करीत असतो. लग्नानंतर हे घडेल हे आम्हाला माहीत होते. मला अजूनही असे वाटते की, मी अविवाहित आहे. कारण- मी महिन्यातील सुमारे १५ दिवस एकटाच आमचे घर सांभाळतो.”

वरुण कपूर काय म्हणाला?

वरुण पुढे म्हणाला, “पण, ते चांगले आहे. आमच्यात योग्य अंतर व जागा आहे आणि आम्ही एकमेकांबरोबर अधिक वेळ घालवण्यास उत्सुक आहोत. आम्ही त्यानुसार आमचा वेळ व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. जर माझी महिला फॅन फॉलोइंग नसती, तर माझी पत्नी कंटाळली असती. लोक मला इतके प्रेम करतात हे पाहून तिला खूप आनंद झाला आहे. तिला माहीत आहे की, मी शेवटी तिच्याकडे परत येईन.”

वरुण कपूर ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये रमणिक लालच्या भूमिकेत दिसला होता. वरुण कपूर हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. वरुणने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात काही गुजराती चित्रपट आणि जाहिरातींमध्ये भूमिका करून केली. कलर्सवरील ‘ना आना इस देस लाडो’ या शोमध्ये त्याने कॅमिओ करून, टेलिव्हिजन जगात प्रवेश केला.