‘ऐ दिल है मुश्किल’ या चिपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेता रणबीर कपूर त्याच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होता. सध्या या चित्रपटाचे सर्व काम शेवटच्या टप्प्यात आले असून रणबीरने वेळात वेळ काढून त्याच्या नव्या घरी राहण्यास जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज कपूर यांच्या वाढदिवसा दिवशीच रणबीर त्याच्या नव्या घरी जाणार असल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये रंगत होत्या आणि अगदी तसेच झाले. मुंबईतील पाली हिल परिसरात रणबीरने त्याचे नवे घर घेतले आहे. या घराच्या संपूर्ण इंटेरियर डिझायनिंगची जबाबदारी किंग खानच्या पत्नीने म्हणजेच गौरी खानने घेतली होती. रणबीरच्या याच नव्या घराची पहिली झलक गौरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
‘वास्तु’ या रणबीरच्या नव्या घराचे फोटो पोस्ट करत गौरीने त्यासोबत काही कॅप्शनही लिहिले आहेत. या फोटोमध्ये नव्या घरात गेल्याचा आनंद रणबीरच्या चेहऱ्यावरही झळकतो आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीर त्याच्या आजीच्या म्हणजे कृष्णा राज कपूर यांच्या घरी त्यांच्याचसोबत राहात होता. पण, आता मात्र सावरिया रणबीरने स्वत:चा ‘आशियाना’ निवडला आहे असेच म्हणावे लागेल. सध्या तरी रणबीर त्याच्या इतर चित्रपटांच्या कामातच व्यग्र असून कतरिना कैफ आणि रणबीरची मुख्य भूमिका असणारा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट ७ एप्रिल २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वी रणबीरच्या या नव्या घराची सुरेख सजावट केल्याबद्दल अभिनेता ऋषी कपूर यांनीसुद्धा सोशल मीडियावरुन गौरीचे आभार मानले होते. ऋषी कपूर यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की,’ ‘वास्तू’ सुंदर. गौरी खान तू रणबीरच्या घराला खरचं ‘घर’ बनवलं आहेस. खूप सुंदर पद्धतीने सजावट केली आहे. मी आणि नीतू आम्ही दोघंही भारावून गेलो आहोत. धन्यवाद.’ शाहरुखची पत्नी गौरी खान ही व्यवसायाने इंटिरीअर डिझायनर आहे. तिने नुकतेच रणबीरच्या घराचे इंटेरियरचे काम पूर्ण केले. तिचे हे काम ऋषी आणि नीतू यांना आवडले आहे. गौरीने व्यावसायिकदृष्ट्या हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान हिच्यासह भागीदारीत एक्सक्लूसिव इंटेरियर प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केलेली. तसेच, तिने स्वतःचे नवे इंटेरियर स्टोर लाँच केले आहे. या स्टोरचे नाव ‘डिझाइन सेल’ असे आहे.
