अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर अखेर आज त्याची सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटका होताच आर्यन ‘मन्नत’वर पोहोचला. आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुखचे सासू-सासरे मन्नतवर उपस्थित असलेले पाहायला मिळाले. त्यांचा मन्नतच्या बाल्कनीमध्ये उभे असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Video : आर्यन खानला पाहण्यासाठी मन्नतवर चाहत्यांची तुफान गर्दी

न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला. न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड कारागृहातील बेल बॉक्स आज पहाटे ५.३० वाजता उघडण्यात आला. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता.

दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.