बॉलिवूडचा लाडका अभिनेता रितेश देशमुख आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी चाहते त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया देखमुखला ओळखले जाते. रितेशच्या वाढदिवसानिमित्त जिनिलियानेही त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
जिनिलिया आणि रितेश दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच जिनिलियाने पतीच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या रिल व्हिडीओत जिनिलिया ही नेहमीप्रमाणे क्यूट हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडीओत तिच्या मागे रितेश बसल्याचे दिसत आहे. या व्हिडीओला तिने नेहमीप्रमाणेच एक हटके कॅप्शन दिले आहे.
‘फक्त ८ दिवस बाकी’ सांगत हृता दुर्गळेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो; सोशल मीडियावर एकच चर्चा
“प्रिय साथीदार, या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करणारी एक खास व्यक्ती नक्कीच असते, असा माझा मनापासून विश्वास आहे. माझ्यासाठी ती व्यक्ती म्हणून नेहमीच तू असशील, याचा मला फार आनंद आहे आणि आज तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला हे सांगायचं आहे की, माझे जीवन तुझ्याशिवाय कधीच म्हणजेच कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तू माझा आज, माझा उद्या आणि माझा कायमचा आहेस आणि मी कितीही वेळा कुरबुरी केल्यात. या गोष्टी कशा अशाव्यात याबद्दल सांगितले तरी त्याचा काहीही फरक पडत नाही. मी आयुष्यात काहीही बदलू शकत नाही. निस्वार्थी, छान माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत,” असे तिने लिहिले आहे.
यात सर्वात शेवटी आयुष्यभरासाठीची तुझी चिअरलीडर असेही तिने म्हटले आहे. सध्या जिनिलियाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही.