अभिनेता गोविंदाने विनोदाचं अचूक टायमिंग साधत आणि आपल्या हटके डान्स शैलीने गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सध्या अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून तो अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चित्रपटांपासून दूर असूनही तो एक शाही जीवन जगतो.
गोविंदाने १९८६ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट ‘इल्जाम’ होता. त्यानंतर तो अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसला आणि त्याने बॉलीवूडमध्ये हीरो नंबर १ चा टॅग मिळवला; पण आता तो वर्षानुवर्षे अभिनयापासून दूर आहे. त्याने सुमारे १८ वर्षांपासून एकही हिट चित्रपट दिलेला नाही. तरीही तो राजेशाही जीवन जगतो. १८ वर्षांपासून एकही हिट चित्रपट न देता, गोविंदा एवढी बक्कळ कमाई कुठून करतो?
गोविंदाची एकूण संपत्ती किती?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गोविंदाची संपत्ती सुमारे १७० कोटी रुपये इतकी आहे. वृत्तानुसार, अभिनेता एका चित्रपटासाठी सहा कोटी रुपये घेतो. आता तो चित्रपटांपासून दूर आहे. परंतु, तरीही तो दरवर्षी करोडो रुपये कमवतो. त्याच्या उत्पन्नाचा स्रोत ब्रँड एंडोर्समेंटदेखील आहे. त्यासाठी तो दोन कोटी रुपये मानधन घेतो.
त्याशिवाय गोविंदाने रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. मुंबईव्यतिरिक्त त्याच्याकडे भारतातील विविध ठिकाणी आलिशान मालमत्ता आहेत. त्याचे जुहूमध्ये १६ कोटींचे आलिशान घर आहे. अभिनेत्याचे मढ बेटावरही एक घर आहे,जे तो शूटिंगसाठी भाड्याने देतो. त्याशिवाय गोविंदाच्या कोलकाता, लखनऊ व रायगडमध्ये आलिशान मालमत्ता आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेता शेवटचा ‘रंगीला राजा’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता.
बॉलीवूड अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा नेहमीच काही न काही कारणामुळे चर्चेत असते. त्या स्पष्टवक्तेपणामुळेही ओळखल्या जातात. गोविंदावर नेहमीच त्या आरोप करताना पाहायला मिळते. १९८७ मध्ये गोविंदाने त्याच्या मामाची मेहुणी सुनीता यांच्याबरोबर लग्न केले. लग्नाची बातमी त्याच्या स्टारडमवर परिणाम करू शकते. या कारणामुळे त्याने त्याचे लग्न झालेय हे अनेक वर्षे लपवून ठेवले होते. पण, लग्नाची बातमी समोर आल्यानंतरही त्याच्या स्टारडमवर कोणताही परिणाम झाला नाही.