संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. आज १० मे रोजी सकाळी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. पंडित शिवकुमार हे ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहें.

भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान अतुलनीय होते. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही त्यांची ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या चित्रपटांना संगीत दिले.