Sanju Rathod : ‘गुलाबी साडी’ असो किंवा ‘शेकी’ संजू राठोडच्या प्रत्येक गाण्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अलीकडच्या काळात संजूची प्रत्येक गाणी सोशल मीडियावर सुपरहिट ठरतात. एवढंच नव्हे तर सामान्य नेटकऱ्यांप्रमाणे मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटींना सुद्धा संजूच्या व्हायरल गाण्यांची भुरळ पडत असल्याचं पाहायला मिळतं. ‘नऊवारी साडी’, ‘गुलाबी साडी’ या दोन्ही गाण्यांना मिळालेल्या भरघोस यशानंतर संजू राठोड खऱ्या अर्थाने नावारुपाला आला.
पण, तुम्हाला माहितीये का संजूचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. मधल्या काळात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. संजूने कोणत्या परिस्थितीवर मात करत आज एवढं यश मिळवलंय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…
संजूचा जन्म जळगावमधील धनवड गावात झाला. घरात संगीताची कसलीच पार्श्वभूमी नव्हती, स्टारडम वगैरे तर अजिबातच माहिती नव्हतं…संजूने संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी विशेष असं शिक्षण देखील घेतलेलं नाहीये.
संजू हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याला स्टेजवर परफॉर्म करताना सुद्धा प्रचंड भीती वाटायची. तो संयमी, लाजाळू आणि क्वचित कोणाशी तरी बोलायचा. पण, त्याच्या मनात संगीताविषयीचं प्रेम मात्र कायम होतं. यानंतर संजूच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी उलाढाल झाली. आयुष्यातील पहिल्या ब्रेकअपमुळे तो खूप खचला. पण, त्याने स्वत:चं आयुष्य थांबू दिलं नाही…इथूनच त्याचा खऱ्या अर्थाने गाणी लिहिण्याचा प्रवास सुरू झाला.
संजूने हळुहळू स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण केला. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये तो परफॉर्म करू लागला. २०१७ मध्ये गायकाने आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय घेतला. भविष्याचं कोणतंही प्लॅनिंग केलेलं नव्हतं, तरीही कॉलेज सोडून त्याने मुंबईला जायचं आणि आपली स्वप्नपूर्ती करायची असं ठरवलं.
मात्र, मुंबईत येऊन करिअर घडवण्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. मित्रासह भाड्याच्या छोट्याशा खोलीत तो राहू लागला. त्याच्याजवळ सेकंड-हँड लॅपटॉप आणि इअरफोन्स होते. यावर त्याने गाणी बनवायला सुरुवात केली. संजू सतत काम करत राहिला…अनेकदा केलेल्या कामाचा नीट मोबदला देखील मिळाला नव्हता. पण, संजूने जिद्द सोडली नव्हती.
अखेर त्याचे सगळे कष्ट फळाला आले जेव्हा त्याच्या गाण्यांची दखल एका निर्मात्याने घेतली. संजूची ‘चमिया’ आणि ‘स्टाइल मारतंय’ ही गाणी सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली. पण, ‘नऊवारी साडी’ आणि ‘गुलाबी साडी’ या दोन गाण्यांमुळे संजू घराघरांत पोहोचला. यानंतर संजूच्या एप्रिल २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शेकी’ गाण्याने तर अवघ्या महिन्याभरातच रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळवल्याचं पाहायला मिळालं.
संजूने मराठी संगीत विश्वाला एक वेगळी दिशा दिली आणि आपल्या मातृभाषेतील गाणी जगभरात सुपरहिट करून दाखवली. त्याने पारंपरिक गाण्यांना आफ्रोबीट रिदम आणि पॉप संगीताची जोड दिली. संजूने स्वत:च्या गाण्यांवर केलेल्या या हटके प्रयोगामुळे सोशल मीडियावर ही गाणी तुफान व्हायरल झाली.
दरम्यान, संजूच्या ‘शेकी’ गाण्याने फक्त २ महिन्यांत युट्यूबवर १५० मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. याशिवाय हे गाणं बिलबोर्ड इंडियावर नंबर एकवर ट्रेंड होत आहे. जळगावच्या लहानशा गावातून आलेल्या संजूने आज संपूर्ण जगभरात ओळख निर्माण केली आहे. त्याचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.