बॉलीवूडचे ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते गुलशन ग्रोवर यांनी ८० च्या दशकात अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये ते मुख्य अभिनेत्याचा मित्र किंवा भावाच्या भूमिकेत दिसले. मात्र, जेव्हा त्यांनी खलनायकाची भूमिका साकारायला सुरुवात केली, तेव्हा सर्व जण थक्क झाले.

‘बाय गॉड, दिल गार्डन गार्डन हो गया’, ‘जो चीज बिकती नहीं, मैं उसे छीन लेता हूं’, ‘मैडम माया तेरी तो मैं पलट दूंगा काया’ आणि ‘जिंदगी का मजा तो खट्टे में है’ यांसारख्या डायलॉग्सने प्रसिद्ध झालेले बॉलीवूडचे ‘बॅड मॅन’ गुलशन ग्रोवर अनेक दशकांपासून पडद्यावर प्रेक्षकांना घाबरवत आहेत.

अलीकडेच, गुलशन ग्रोवर अर्चना पूरण सिंह आणि परमित सेठी यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांनी अभिनेत्रीच्या ब्लॉगमध्ये भाग घेतला. गुलशन ग्रोवर यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि पडद्यावरच्या प्रतिमेबद्दल अनेक मनोरंजक किस्से शेअर केले. या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा मुली त्यांच्यापासून दूर पळत असत. कारण लोक त्यांना खऱ्या आयुष्यातही खतरनाक खलनायक मानत असत.

“मुली माझ्या जवळ यायला घाबरायच्या” : गुलशन ग्रोवर

संभाषणादरम्यान जेव्हा परमित सेठीने विचारले की, असे कधी झालं आहे का जेव्हा मुली तुमच्या जवळ येत नव्हत्या, तेव्हा गुलशन यांनी लगेच होकार दिला आणि हसत म्हणाले, “जेव्हा सोशल मीडिया नव्हता, तोपर्यंत कोणतीही मुलगी त्यांच्या जवळ येत नव्हती, कारण त्यांना वाटायचे की पडद्यावर जे काही दिसते तेच खऱ्या आयुष्यातही असते.” गुलशन यांनी सांगितले की, चित्रपटांमध्ये त्यांची ‘बॅड मॅन’ शैली लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजली होती की खऱ्या आयुष्यातही त्यांना खतरनाक मानले जात असे.

सोशल मीडिया आल्यानंतर गोष्टी हळूहळू कशा बदलू लागल्या हे त्यांनी सांगितले. त्यांनी एक मजेदार किस्सा सांगितला आणि म्हणाले, “जेव्हा सोशल मीडिया आला तेव्हा मी एका पार्टीत पोहोचलो. अर्चना मला भेटली आणि मी तिला मिठी मारली, दुसऱ्या एका नायिकेने ते पाहिले आणि सुरुवातीला तिला विश्वासच बसत नव्हता की चित्रपटात ती धावत होती आणि इथे ती मिठी मारत आहे, हा काय मूर्खपणा आहे. मग हळूहळू लोकांना समजले की तो फक्त एक पात्र साकारत आहे.”

‘राम लखन’मधील प्रसिद्ध भूमिकेनंतर गुलशन ग्रोवर यांना कायमचा ‘बॅड मॅन’चा टॅग मिळाला. ‘मोहरा’, ‘सर’, ‘हेरा फेरी’ आणि ‘डुप्लिकेट’सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या नकारात्मक भूमिका अजूनही प्रेक्षकांना आठवतात. त्यांनी केवळ हिंदीमध्येच नव्हे तर हॉलीवूड चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

गुलशन ग्रोवर लवकरच उमेश शुक्ला दिग्दर्शित ‘हीर एक्स्प्रेस’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात दिव्या जुनेजा तिच्या पदार्पणाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्याबरोबर आशुतोष राणा, संजय मिश्रा, प्रीत कामानी आणि स्वतः गुलशन ग्रोवर हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.