सेलिब्रिटी हेअर ड्रेसर आलिम हाकीम हे बॉलीवूडमधील एक मोठे नाव आहे. त्याने अनेक स्टार्सचे केस कापले आहेत. अलीकडेच आलिम हाकीमने सांगितले की, त्याने वयाच्या नवव्या वर्षी त्याचे वडील गमावले.
अमिताभ बच्चन त्यांच्या ‘मर्द’ चित्रपटात काम करीत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. आलिम हाकीमच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.
आलिम एका पारंपरिक न्हावी कुटुंबातील आहे. त्याने चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या स्टार्सबरोबर काम केले आहे. ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत आलिम हाकीमने सांगितले की, जेव्हा जेव्हा त्याला अमिताभ बच्चन यांचे केस कापण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा तो खूप भावनिक होतो. कारण- अमिताभ बच्चन हे त्याच्या दिवंगत वडिलांबरोबर काम केलेले शेवटचे स्टार होते.
अमिताभ बच्चन यांचे केस कापताना झाला मृत्यू : आलिम हाकीम
आलिम म्हणाला, “माझ्या वडिलांनी अमिताभ बच्चन यांचे शेवटचे हेअर कट केले होते. ते ‘मर्द’ चित्रपटासाठी म्हैसूरला गेले होते आणि काम करताना त्यांच्या छातीत दुखत होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले. म्हणून त्यांचे शेवटचे हेअर कट अमिताभ बच्चन यांचे होते. मी जेव्हा जेव्हा अमितजींचा लूक तयार करतो तेव्हा तेव्हा मी खूप भावनिक होतो. एका जुन्या मुलाखतीत आलिमने सांगितले होते की, जेव्हा त्याचे वडील वारले तेव्हा त्याच्या खात्यात फक्त १३ रुपये होते.
आलिम म्हणाला की, त्यांचा वारसा पाच दशकांहून अधिक जुना आहे. तो म्हणाला, ‘रेश्मा और शेरा’नंतर अमितजींनी केलेल्या प्रत्येक चित्रपटात माझे वडील हेअरड्रेसर होते. ‘रेश्मा और शेरा’मध्ये ते ऑफिशियल हेअरड्रेसर होते. त्यांनी विनोद खन्ना ते सुनील दत्त साहेब आणि अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांचा लूक केला होता. खरं तर, सुनील दत्त यांनीच माझ्या वडिलांची विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्याशी ओळख करून दिली होती. माझ्या वडिलांनी अभिषेक बच्चन, संजय दत्त, अक्षय खन्ना, राहुल खन्ना, जायद खान अशा अनेक कलाकारांचे मुंडन केले होते.”
आलिमने सांगितले की, तो प्रत्येक सेशनसाठी एक लाख रुपये घेतो; मग तो क्लायंट कोणीही असो. तो म्हणाला की, जर क्लायंट त्याचा जवळचा मित्र नसेल, तर त्याच्या फीमध्ये कोणताही बदल होत नाही. चित्रपटांमध्ये काम करत असतानाही तो प्रत्येक सेशनसाठी एक लाख रुपये घेतो. अशा प्रकारे तो बॉलीवूडमधील सर्वांत महागड्या हेअरड्रेसरपैकी एक आहे.