‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा साखरपुडा अलिकडेच पार पडला. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण मालिकेत एकत्र काम करत असतानाही या दोघांच्या नात्याबद्दल कोणाला अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांचा साखरपुडा सर्वांसाठी सुखद धक्काच होता. आता या दोघांच्या लग्नाबाबत चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. हे दोघं लग्न कधी करणार आणि कुठे करणार याची सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना नुकत्याच एका मुलाखतीत हार्दिकनं याचं उत्तर दिलं आहे.

अक्षया आणि हार्दिक लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवातही झाली आहे. पण अलिकडेच या जोडीने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी या मंचावर त्यांनी धम्माल गप्पा मारल्या आणि लग्नाच्या प्लानबद्दलही बरेच खुलासे केले. या शोमध्ये या दोघांना ‘लग्न कुठे करणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना हार्दिक म्हणाला, “आम्ही लग्न पुण्यात करणार आहेत. वेन्यू अजून नक्की केलेला नाही. काही दिवसांपूर्वीच आम्ही, विराजस आणि शिवानीनं ज्या ठिकाणी लग्न केलं ती जागा पाहून आलो आहोत. तिथेच लग्न करण्याचा आमचाही विचार आहे.”

आपल्या साखरपुड्याबद्दल बोलाताना हार्दिक म्हणाला, “आमच्या साखरपुड्याचे आउटफिट्स हे कोल्हापूरवरून मागण्यात आले होते. कोल्हापूरशी आमचं खास नातं आहे. आम्ही दोघांनी ज्या मालिकेत एकत्र काम केलं त्याची कथा कोल्हापूरमधली होती. तिथेच आमच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली होती. त्यामुळे मालिकेच्या आठवणी जपण्यासाठी आम्ही कपडे कोल्हापूरवरूनच मागवणार असं ठरलं होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय या शोमध्ये हार्दिकनं अक्षयाच्या स्वभावाविषयी देखील सांगितलं. “ती कोणत्या गोष्टीवर किती आणि काय प्रतिक्रिया देणार याचा मला अंदाज असतो. एकंदर वाघ कधी डरकाळी फोडणार हे माहीत असतं.” असंही तो मिश्किलपणे म्हणाला. तर ‘अक्षयाबद्दल तुला कोणती गोष्ट आवडत नाही?’ या प्रश्नावर तो म्हणाला, “ती पटकन रागावते आणि त्यानंतर ती काही बोलते, काहीही करू शकते. मला वाटतं लग्नानंतर तिने ही गोष्ट बदलायला हवी.” दरम्यान अक्षया आणि हार्दिक यांनी ३ मे रोजी ठाण्यात साखरपुडा उरकला होता. त्यांच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.