भारतीय हरनाज कौर संधू हिने यंदाच्या मिस युनिव्हर्स २०२१ चे विजेतपद पटकावले आहे. तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स 2021’चा खिताब जिंकला. भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स 2021’ या मुकुटाची मानकरी ठरली. यंदा मिस युनिव्हर्स ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली. हरनाजच्या आधी २००० मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने हा खिताब जिंकला होता.
मिस युनिव्हर्स या स्पर्धेत ७५ हून अधिक सुंदर आणि प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. त्यातील तीन देशातील सौंदर्यवतींनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले. यात दक्षिण आफ्रिका, पॅराग्वे या दोन्ही सौंदर्यवतींना मागे टाकत भारताच्या हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावला.
हरनाझच्या विजयाचा एक व्हिडीओ मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओत भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू आणि पॅराग्वेची सौंदर्यवती नदिया फरेरा या दोघी एकमेकांचा हात धरुन उभ्या असल्याच्या दिसत आहे. त्यावेळी हरनाझच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या मनात सुरु असलेली धडधडही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे. यावेळी AND The New Miss Universe is….INDIA. असे जाहीर होते.
यानंतर हरनाझ ही खाली वाकून रडायला लागते. यावेळी तिच्या डोळ्यात असलेले आनंदाश्रू स्पष्ट दिसत आहे. यानंतर ती नदिया फरेराला मिठी मारते आणि नंतर ती हात जोडून देवाचे आभार मानताना दिसत आहे. यानंतर तिला फुलांचा पुष्पगुच्छ दिला जातो आणि मानाचा मिस युनिव्हर्सचा मुकूट तिला परिधान केला जातो. हा मुकूट घातल्यानंतर ती तोंडावर हात ठेवत रडायला लागते.
हा संपूर्ण क्षण एका कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. या व्हिडीओला अवघ्या तीन तासात २६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहे. तर या व्हि़डीओवर लाखो कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. दरम्यान मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवल्यानंतर हरनाझवर भारतासह जगभरातून वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रेटींसह राजकीय व्यक्ती, व्यावसायिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे अभिनंदन केले आहे. यानंतर सोशल मीडियावर हरनाझ संधू असा टॅगही ट्रेंड होताना दिसत आहे.