अभिनेता हर्षवर्धन राणे त्याच्या आगामी ‘दीवानियत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ४१ वर्षांचा हा अभिनेता सध्या अभ्यासातही गुंतला आहे. लवकरच तो पेपर देण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये असेल. त्याने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे. हर्षवर्धनने पोस्ट शेअर करून सांगितले की, त्याची परीक्षा जूनमध्ये आहे, ज्यासाठी तो अभ्यास करीत आहे.
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. जूनमध्ये मानसशास्त्राच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा आहे. माझ्या मनात फक्त एकच गोष्ट सुरू आहे, मला चांगले काम करायचे आहे.” शेअर केलेल्या फोटोंमध्ये हर्षवर्धन स्टडी टेबलवर ठेवलेल्या नोट्स वाचताना दिसत आहे.
अभिनेता मानसशास्त्रात पदवी घेत आहे आणि त्याने आधीच ही गोष्ट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनेता हर्षवर्धन राणेच्या आगामी रोमँटिक चित्रपट ‘दीवानियत’चे चित्रीकरण देखील सुरू आहे. तो त्याच्या चाहत्यांबरोबर प्रत्येक क्षणाचे अपडेट शेअर करीत राहतो. या संदर्भात त्याने सांगितले की, हा आगामी चित्रपट त्याच्या आतापर्यंतच्या सर्वांत मजबूत स्क्रिप्टपैकी एक आहे. परंतु, या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.
शूटिंगच्या १० व्या दिवसाचे फोटो शेअर करताना हर्षवर्धनने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “ही माझी आतापर्यंतची सर्वांत मजबूत स्क्रिप्ट आहे, जी मुश्ताक शेख यांनी लिहिली आहे. मिलाप जावेरी हे एक दिग्दर्शक आहेत, जे ही उत्तम कथा सांगण्यास उत्सुक आहेत. सोनम बाजवा एक प्रामाणिक आणि उत्तम अभिनेत्री आहे.”
तुम्हाला ‘लेफ्ट राईट लेफ्ट’ ही मालिका आठवते का? ही मालिका तरुणाईमध्ये चांगलीच लोकप्रिय होती. २००८ साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हर्षवर्धनने या मालिकेमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. नंतर दक्षिणेतही त्याने आपला ठसा उमटवला. त्याने ‘ना इष्टम’, ‘अवुनू’, ‘प्रेमा इश्क मुश्किल’, ‘अनामिका’ व ‘माया’ यांसारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. हर्षवर्धनला ‘सनम तेरी कसम’ या रोमँटिक चित्रपटामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.