हिंदी चित्रपटसृष्टीमधील हेलन हे नाव न ऐकलेली क्वचितच एखादी व्यक्ती असेल. हेलन यांनी आपल्या नृत्याच्या जोरावर सर्वांचीच मनं जिंकली. हेलन यांना वयाच्या १९ व्या वर्षीच मोठा ब्रेक मिळाला. ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटातून हेलन यांच्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळाली. चित्रपटसृष्टीमध्ये असणारं त्यांचं योगदान अमुल्य आहे. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिल्यानंतर हेलन बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्या. आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांमध्ये कमबॅक करण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.

दिग्दर्शक अभिनय देव यांच्या ‘ब्राउन’ चित्रपटामध्ये हेलन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हेलन यांच्याबरोबरच अभिनेत्री करिश्मा कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसेल. हा चित्रपट अभिक बरुआचं पुस्तक ‘सिटी ऑफ डेथ’ वर आधारित आहे. कोलकता या शहराची पार्श्वभूमी या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. तसेच सुर्य शर्मा देखील या चित्रपटामध्ये काम करताना दिसतील.

आणखी वाचा – रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये हिंदीसह मराठी कलाकारही झळकणार, पाहा चित्रपटाचं धमाल पोस्टर

चित्रपटामधील आपल्या भूमिकेविषयी बोलताना हेलन म्हणाल्या की, “जेव्हा पहिल्यांदा मला या चित्रपटाबाबत विचारण्यात आलं तेव्हा या चित्रपटाच्या टीमला माझ्या भूमिकेबाबत कितपत स्पष्टता आहे हे मला कळालं होतं. मी या भूमिकेचा अभ्यास केला. आणि पुन्हा एकदा सेटवर परतल्यावर आपलं काम स्वतः एण्जॉय करायचं ठरवलं,”

आणखी वाचा – Photos : लग्नाला पाच महिने पूर्ण होताच न्यूयॉर्कला पोहोचले विकी-कतरिना, रोमँटिक फोटो व्हायरल

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी जेव्हा शेवटचं चित्रपटामध्ये काम केलं आणि पुन्हा तिथेच परत आल्यावर कितपत बदल झाले आहेत हे पाहून मी हैराण झाले. पण सगळे बदल पाहून मला खूप बरं वाटलं. कारण आता जे काम होत आहे हे मी याआधी कधीच अनुभवलं नाही.” हेलन यांनी तब्बल ७०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता पुन्हा एकदा नवं काहीतरी करण्याचा त्या प्रयत्न करणार आहेत.