Hemant Dhome on Education Minister Dada Bhuse Hindi Imposition : राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे. कोवळ्या मुलांवर सरकारने तीन-तीन भाषा शिकण्याची सक्ती केली आहे. राज्यातील जनता, विरोधी पक्षांचे नेते, कलाकार, विचारवंत व साहित्यिकांनी फडणवीस सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, हा विरोध पाहता राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. भुसे म्हणाले, इयत्ता पहिलीपासून नव्हे तर तिसरीपासून हिंदी शिकवली जाईल. पहिली-दुसरीतील विद्यार्थ्यांना केवळ ‘मौखिक’ शिक्षण दिलं जाईल.

शिक्षणमंत्री दादा भुसे केवळ माध्यमांसमोर मौखिक शिक्षणाबाबत प्रतिक्रिया देत आहेत. यासंदर्भातील आदेश काढलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर आणखीनच टीका होऊ लागली आहे. “हा सगळा हास्यास्पद फार्स चालू आहे”, अशा शब्दांत लेखक-दिग्दर्शक व अभिनेता हेमंत ढोमे याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. हेमंतने यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने उपरोधिकपणे म्हटलं आहे की “ही विचार मांडणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या संगळ्यांना मौखिक चपराक आहे.”

हेमंत ढोमेने त्याच्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

हेमंत ढोमे म्हणाला, “यंदा इयत्ता पहिलीला तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा “मौखिक” असेल, पुस्तकं नसतील, पण मास्तर मुलांना तिसरी भाषा शिकवतील, असं शिक्षणमंत्री म्हणालेत. हे म्हणजे कसं झालं… विचार मांडणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या संगळ्यांना मौखिक चपराक… हा सगळा एक हास्यास्पद फार्स चालू आहे… सगळी कशी गंमाड्डी गंमत.”

सरकारने तिसऱ्या भाषेसाठी प्रयत्न सुरू केल्यापासून, यासंदर्भातील अधिसूचना काढल्यापासून हेमंत ढोमे सातत्याने राज्य सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत आहे. आता देखील सरकारची मौखिक सारवासारव पाहून हेमंतने त्याची भूमिका मांडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय?”

यायाधी सरकारने अधिसूचनेतून अनिवार्य शब्द काढला तेव्हा देखील हेमंतने संताप व्यक्त करणारी पोस्ट लिहिली होती. त्याने म्हटलं होतं की “हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी. कृपया हा जीआर नीट वाचा… हिंदी ही तृतीय भाषा असेल… ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल, त्यासाठी किमान २० इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?) म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेले आहे… पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार ? आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही? एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर… पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध! आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय? महाराष्ट्रात मराठीच…”