‘बुरा ना मानो होली है..’ म्हणत ज्यांना रंगाची-पाण्याची भीती त्यांनाही आपल्याबरोबर घेत चिंब भिजवणारा रंगपंचमीचा सण.. होळीच्या रात्री वाईट काय ते होळीच्या अग्नीत समर्पित करून आणि वाईटाच्या नावाने बोंब ठोकून मनं आधीच मोकळी झाली असतात. त्यानंतर उजाडणारी ही रंगांची सकाळ अधिकच ताजीतवानी असल्याने आपल्या मित्रपरिवाराची टिंगलटवाळी करत, त्यांना रंगात रंगवून सोडण्यासाठी हात शिवशिवत असतात. सोबतीला थंडाई आणि मिठाईचा रंग.. अशा वेळी खरं म्हणजे आपल्या मित्रांना किंवा जवळच्याला शाब्दिक चिमटे घेतल्याशिवाय खरं म्हणजे मस्तीचा रंग चढत नाही. या होळीनिमित्ताने मालिका, चित्रपट, नाटक, संगीत क्षेत्रातील काही इरसाल कलाकारांनी अगदी करण जोहरपासून या क्षेत्रातील आपल्या कलाकारांसाठी केलेली शाब्दिक रंगांची उधळण.. माहौल मस्तीचा असल्याने पुन्हा एकदा मस्तीत केलेली रंगांची उधळण मनाला लावून घेऊ नये.. बुरा ना मानो होली है..

मराठी दूरदर्शन मालिका, चित्रपट, नाटक यांतून अभिनय करता करता लेखक-दिग्दर्शक झालेल्या राजेश देशपांडे यांनी या रंगपंचमीसाठी सध्या बॉलीवूडमध्ये शाब्दिक ‘पंच’मी खेळणाऱ्या करण जोहरला शेलापागोटे दिले आहेत. करण जोहरला झालेल्या जुळ्या मुलांच्या बातमीची चर्चा सध्या प्रसारमाध्यमांतून रंगते आहे.

  • करण जोहर..

जोहर माय बाप,

जोहर महान,

माझी कुळी,

काहीही करणी

न करता

झाली मला जुळी

 

निर्मिती सावंत यांच्यासाठी..

गंगूबाई म्हणून तू फेमस लहान थोरात

तूच ‘श्यामची मम्मी’ ‘जाडू’बाई जोरात

अभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेने ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलले आहे. त्याने जिच्याबरोबर काम केलं त्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर)च्या स्वभावाबद्दल सांगण्याचा मोह त्याला आवरला नाही.

  • बाई गं बदल जरा..

सोनालीला तिच्या बाबतीतली किंवा अन्य कोणाच्याही संदर्भातील एखादी गोष्ट सांगितली की तिला त्यातलं चांगलं काही दिसण्यापेक्षा, त्यातून आनंद घेण्यापेक्षा ती त्यात पहिल्यांदा काहीतरी खोड काढते. त्यातलं वाईटच पहात असल्याने तिला कधीही त्या गोष्टीतला आनंद घेता येत नाही. आपल्या चित्रपटाचं पोस्टर कोणी आपल्याला दाखवलं तर आपण काय म्हणू.. ‘व्वा, छान, सुरेख’. हिची प्रतिक्रिया मात्र एकदमच उलट. ‘या पोस्टरमधलं स्पेलिंग चुकलं आहे, हा काय फॉन्ट बरोबर नाही..’. लोकांना विमानातून जाताना त्याच्या खिडकीतून खालची मुंबई बघितली की वा काय छान. काय मस्त आहे रे असं काहीसं होऊन जातं. हिला मात्र ती विमानाची खिडकी जरा छोटीच दिसते. ही खिडकी मोठी हवी होती रे.. काहीच नाही तर किती वाकडी होती ती खिडकी, असं म्हणेल. बाई गं..बदल जरा आता तुझा हा स्वभाव.

  • ‘चॉकलेट बॉय’ सिद्धार्थ चांदेकरसाठी..

काळ-वेळेच्या गणिताचं यांच्याशी वाकडं आहे

सिद्धू वेळ, काळ, जागा आणि घडय़ाळ यांचेही काही महत्त्व असते. रे आणि त्याचा उपयोग आपण करायचा असतो. कधी कळायचं रे हे तुला? सिद्धार्थ म्हणजे बागेत गेलेला आणि तिथे कुठेही बागडणारा उनाडमुलगा आहे. सिद्धू जरा वेळ, काळ, घडय़ाळ याचे भान बाळगत जा रे..

ऋषी सक्सेना, (शिव- काहे दिया परदेस)

  • ‘गौरी’जी आपके लिये..

माझं कुटुंब राजस्थानला असल्याने मी मुंबईत एकटाच. असतो मुंबईत माझी जवळची मत्रीण व मला ओळखणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ‘गौरी’ अभिनेत्री सायली संजीव. माझ्या मनात नेमकं काय चालू आहे हे तिला बरोबर समजतं. पण तिचं कौतुक कितीही असलं तरी ती गाडी खूप वाईट चालवते. गाडी चालवताना तिच्या भावना दाटून येतात. तिचे मोकळे केस, नाकावर आलेला राग, कपाळावरच्या आठय़ा, मोठे रागाने फुगलेले डोळे या सगळ्या गोष्टी गाडी चालवतानाही एकत्र येतात. त्यामुळे मीही घाबरतो. बस्स! अपना यह गुस्सा भी कम करना जरुरी है.. गौरीजी बुरा ना मानो होली है !

मंगेश बोरगावकर

  • संगीतकार निलेश मोहरीर हा माझ्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठा आहे. पण आमच्या मैत्रीत वयाचं अंतर कधी जाणवलं नाही. निलेशला फॅशनबद्दल फार ज्ञान आहे तसाच तो खवय्या आहे. मी त्याला ए निलेश अशी शेवटची हाक कधी मारली होती हे मलाच आठवत नाही. मी त्याला ‘निमो’ या नावाने हाक मारतो. तरुण दिसण्यासाठी नेहमीच धडपडणाऱ्या निलेशसाठी खास..

सभी आपको कहते है मेलडी किंग.

आप फॅ शन के दीवाने और खाने के है शौकीन.

हमेशा यंग रेहने की ये कौनसी गोली है?

बुरा ना मानो होली है !! २

निलेश मोहरीर

  • मंगेश हा माझा जीवश्च कंठश्च मित्र आहे. आमच्या दोघांची खूप चांगली मैत्री आहे. मंगेश हा कोणालाही लगेच आपलंसं करतो. समोरचा कुठे चुकला आहे हे तो त्या व्यक्तीला गोड शब्दात समजावून सांगतो. पण शेवटी नाण्यालासुद्धा दोन बाजू असतात. मंगेश रेकॉìडग, गाण्याचा कार्यक्रम, मीटिंग या सर्व ठिकाणी नेहमी उशिराच पोहोचतो. तो वेळ अजिबात पाळत नाही. जर त्याला कोणी फोन वर विचारलं की कुठे आहात सर तुम्ही? तर तो तेव्हा घरात असतो आणि लोकांना सांगतो मी हायवेवर आहे. उशिरा येण्याचा हा दुर्गण होळीत समर्पित कर आणि वेळेचं बंधन गोड मानून घे मित्रा..

चिन्मय उद्गीरकर

  • ऋतुजा बागवे ही माझी मत्रीण नसून तो माझा मित्रच आहे. तिला मुलांसारखं राहायला, वागायला फार आवडतं. ती कोणतीही गोष्ट अगदी शांतपणे सोडवते. ती तशी खूप शांत आहे व हळवी आहे. कोणी काही बोललं तर ती लगेच मनाला लावून घेते व रडू लागते. त्यामुळे मी माझ्या या बंडय़ाला एवढंच सांगेन की एरव्ही जशी तू पटकन रडतेस तशीच शूटिंग करताना सीनमध्येही अशीच पटकन ढसाढसा रडत जा. तिकडे रडण्याऐवजी उगाच हसत बसू नकोस व रिटेक घ्यायला लावू नकोस.

तुजा बागवे

  • चिन्मय उद्गीरकरला मी कधीच ए चिन्मय अशी हाक मारत नाही. मी नेहमी त्याला ‘ए चिनप्पा’ म्हणते. माझा जवळचा व हक्काचा मित्र चिन्मय जो सतत माझ्यावर हक्काने चिडतो त्याला मला आज मनापासून सांगायचंय की त्याने कृपया आपल्या मनातल्या भावना व्यक्त कराव्यात. राग आला तर रागवावं. रडू आलं तर बिनधास्त रडावं. तू माणूस आहेस त्यामुळे माणसात राहत जा. वक्तपे मन की बात बताना भी जरुरी है!

अभिनयासह दिग्दर्शकाच्या भूमिकेतील नवी खेळी सुरू केलेल्या अभिनेता प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील मित्र-मैत्रिणींची फिरकी घेतली आहे.

  • पुष्कर श्रोत्रीसाठी..

आपण खूप ‘फास्ट’ आहोत असे त्याला वाटते, पण त्याच्या इतका ‘स्लो’ माणूस मी तरी पाहिलेला नाही.

अभिनेता अतुल परचुरे यांना ‘कशात काही प्रॉब्लेम’ नाही असे वाटत असते. पण प्रत्यक्षात मात्र खूपच प्रॉब्लेम असतात..

  • खास संतोष जुवेकरसाठी..

सगळे रोल आपल्यालाच मिळावे, संतोष असे कसे होईल?

  • अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर व अभिनेत्री अमृता सुभाष यांच्यासाठी..

‘एनएसडी’हून आलेल्या पण ‘अ‍ॅटिटय़ूड’ नसलेल्या दोनच व्यक्ती मी आत्तापर्यंत पाहिल्या आहेत. त्यातील एक चिन्मय मांडलेकर आणि दुसरी अमृता सुभाष..

सचिन देशपांडे

  • अभिनेता रोहन गुजरसाठी

रोहन आणि मी आम्ही दोघेही ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या आधीपासूनच एकमेकांना ओळखत होतो. रोहन तेव्हा मालिकेत िपटय़ाचं पात्र साकारत होता तेव्हा तो फार जास्त खादाड होता. पिझा विथ चीज, चिकन, मॅकडी बर्गर, फ्रेंच फ्राइज इत्यादी गोष्टी तो दररोज हावऱ्यासारखा खात असे. त्या त्या दुकानदारांचा तो छानपकी धंदा करून देत असे. तेव्हा आम्ही त्याला खूप सांगायचो की हे कमी खात जा तुझं पोट फार पुढे आलंय. पण तो नाहीच ऐकायचा. आता अचानक मालिका संपल्यावर त्याच्या मनात फिटनेसविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. तो फिटनेसचे धडे गिरवतोय. त्यामुळे झालं आहे काय की त्या दुकानदारांच्या धंद्यावर वाईट परिणाम होतो आहे. सगळे आपलेच आहेत त्यामुळे निदान होळीच्या दिवशी तरी रोहनने लक्षात ठेवावं. कभी कबार पिझा, बर्गर खाना भी जरुरी है, बुरा ना मानो होली है..

 

रोहन गुजर

  • सचिन देशपांडेसाठी

मी आणि सचिन देशपांडे आम्ही दोघांनी एकत्र अनेक ऑडिशन्स दिल्या आहेत त्याचं आणि माझं एकाच कॉमन गोष्टी मुळे सिलेक्शन व्हायचं नाही ते म्हणजे आम्हा दोघांची ‘कमी उंची’. आम्ही बुटके असल्यामुळे आम्हाला बऱ्याच ठिकाणी नाकारलं गेलं. मला या गोष्टीचं कधीच काहीच वाटलं नाही, पण सचिन ही गोष्ट फार मनाला लावून घेतो. या होळीनिमित्ताने सचिन आपल्यात ज्या गोष्टी नाहीत, त्याचा स्वीकार करणंही महत्त्वाचं आहे.