scorecardresearch

मालिकांमध्ये होलिकोत्सव

मार्च महिन्याची उल्हसित आणि रंगीबेरंगी सुरुवात होळीच्या सणाने होते. आपल्या जीवनातील कडू-गोड आठवणींना हे सप्तरंग वेगळाच रंग देतात.

man2 serial holi

मार्च महिन्याची उल्हसित आणि रंगीबेरंगी सुरुवात होळीच्या सणाने होते. आपल्या जीवनातील कडू-गोड आठवणींना हे सप्तरंग वेगळाच रंग देतात. करोनाकाळात सण-उत्सवांवर आलेले निर्बंध आता पूर्णपणे नाहीसे झाल्यानंतर सर्वसामान्यांबरोबरच कलाकारदेखील मोठय़ा उत्साहात होळीचा सण मालिकेच्या सेटवर पुन्हा एकदा साजरा करताना दिसत आहेत.

होळी हा रंगांचा सण वैविध्यपूर्ण व आकर्षक असून उत्साह आणि जल्लोषाचे प्रतीक आहे. एकीकडे पूर्वी कलाकार एकत्र येऊन धुळवड साजरी करत असत. हिंदीत आर. के. स्टुडिओ, महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडची होळी पार्टी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय होती. काळाच्या ओघात आर. के. स्टुडिओच नामशेष झाला आहे. आता अनेक कारणांमुळे हिंदीतील होळी पार्टय़ांचे प्रमाण कमी झाले आहे. मराठीतही कलाकार एकत्र येऊन धुळवड साजरी करतात. मात्र आता तेही प्रमाण कमी झाले आहे. या सगळय़ात टिकून राहिली आहे ती हिंदी आणि मराठी मालिकांच्या सेटवरची होळी आणि धुळवड.  उत्साह आणि आनंदाचे प्रतीक असलेला हा होळीचा सण प्रत्येक कलाकार आपल्या सहकलाकारांसोबत मालिकेच्या सेटवर आनंदाने साजरा करताना दिसतात.

हिंदी मालिकांमध्ये अर्थात धुळवड किंवा रंगपंचमीला अधिक महत्त्व दिसून येते. रंगांची उधळण, पिचकाऱ्यांची जुगलबंदी, थंडाई असा सगळा रंगारंग माहौल सेटवर असतो. याचा मालिकेच्या कथानकांमध्येही चपखलपणे वापर करून घेतला जातो. मराठी मालिकांमध्ये धुळवडीपेक्षा होळीला अधिक महत्त्व असते. मराठीत होळी आणि रंगपंचमी दोन्हींचे चित्रण बहुतांशी केले जाते. मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने कलाकारांना कित्येकदा आपल्या कुटुंबीयांसोबत  हे सण साजरे करता येत नाहीत. अशा वेळी मालिकांमधील सहकलाकारच त्यांचे कुटुंब असते. याच सहकलाकारांच्या कुटुंबासोबत झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सोनी मराठी या वाहिन्यांबरोबरच हिंदीतील विविध वाहिन्या आणि त्यांच्या मालिकांमधील कलाकारांनी सेटवर होळी साजरी केली. दिवसाचे अनेक तास मालिकांच्या चित्रीकरणातून थकलेल्या कलाकारांना सेटवर साजरे होणारे हे सण-उत्सव वेगळाच आनंद देऊन जातात. येता आठवडा हा सेटवरच्या धुळवडीने रंगारंग झालेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नक्की!

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 00:03 IST