‘यहाँ सिर्फ पैसे नही.. दिल भी जीते जातें है..’ असं नविन घोषवाक्य घेऊन आलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोच्या आठव्या पर्वाची घोषणा प्रसारमाध्यमांसमोर सुरतमध्ये केली जाणार आहे. ‘केबीसी’च्या या प्रसिध्दी कार्यक्रमाची सूत्रे यावेळी बिग बींच्या नव्हे तर अभिनेता ह्रतिक रोशनच्या हातात देण्यात आली होती. ह्रतिक या प्रसिध्दीकार्यक्रमासाठी सूरत येथे हजर राहणार होता. मात्र, सध्या सुझ्ॉनच्या पोटगीवरून सुरू असलेल्या चर्चेला तोंड द्यावे लागू नये म्हणून ऐनवेळी ह्रतिकने सूरतला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
‘केबीसी’च्या आठव्या पर्वासाठी वेगळ्या तऱ्हेने प्रसिध्दी केली जात आहे. ‘केबीसी’ चा पहिला पाहूणा कॉमेडियन कपिल शर्माला पसंती देण्यात आली आहे. पहिल्यांदाच ‘केबीसी’ची घोषणा यावेळी मुंबईत न करता सूरतमध्ये करण्यात येते आहे. आणि भरीस भर म्हणून याच कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ह्रतिक रोशनची खास उपस्थिती असणार होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुझ्ॉनने ह्रतिककडे पोटगी म्हणून ४०० कोटी रुपये मागितल्याच्या अफवेने खळबळ उडवून दिली आहे. ट्विटरवरून ह्रतिकच्या चाहत्यांसह अनेकांनी यासाठी सुझ्ॉनची खिल्ली उडवली आहे. सतत सुरू असलेल्या या चर्चेने ह्रतिक अत्यंत वैतागला असून त्याने ट्विटरवर याबाबत नाराजीही व्यक्त केली.
सुझ्ॉनने माझ्याकडे अशी मागणी केलेली नाही. चुकीची माहिती देऊन त्यावर सध्या गहजब के ला जातो आहे. या सगळ्या प्रकारामुळे माझे निकटवर्तीय दुखावले जात असून लोक माझ्या संयमाची परीक्षा घेत आहेत, असे ह्रतिकने म्हटले आहे. याच कारणावरून प्रसारमाध्यमांसमोर जावे लागू नये, यासाठी ह्रतिकने ऐनवेळी सूरतमध्ये ‘केबीसी’च्या कार्यक्रमाला येण्यास नकार दिल्याचे समजते.