आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ चित्रपटासाठी चित्रीकरणात व्यग्र असलेल्या अभिनेता ह्रतिक रोशनला दुखापतीमुळे पुन्हा एकदा सक्तीची विश्रांती घ्यावी लागली आहे. याआधी ‘बँग बँग’ या चित्रपटाच्यावेळी ह्रतिकला स्टंट करत असताना डोक्याला मार लागल्यामुळे शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. ‘मोहेंजोदडो’च्या सेटवर त्याला गंभीर दुखापत झालेली नसली तरी त्याला काही आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे.
ह्रतिक रोशन नेहमीच आपल्या चित्रपटातील स्टंट्स स्वत:च करत असल्याने त्याला कित्येकदा दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. ‘मोहेंजोदडो’च्या सेटवरही चित्रिकरण असताना उंचावरून खाली पडल्याने त्याला मार लागला आहे. आता पुढचे काही दिवस या दुखापतीतून बरे होताना आणि पुढे काम सुरू ठेवताना मजा येणार आहे, अशा शब्दांत ह्रतिक ने ट्विट केले आहे. आपल्याला या दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी काही आठवडे लागतील, असे ह्रतिकने म्हटले आहे.