तब्बल दोन वर्षांनंतर हृतिक रोशन ‘सुपर ३०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. या चित्रपटात हृतिक गरीब मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कोणताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद कुमार यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दिसणार आहे. ट्रेलरमधूनच हृतिकने आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांचं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांपुढे साकारलं आहे.
या चित्रपटातील ‘पैसा’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात हृतिक म्हणजेच आनंद कुमार यांचा एक साधा माणूस ते पैसे कमावणारा शिक्षक असा प्रवास दाखवला आहे. पैशाची ताकद हृतिकला दिसते. मेहनतीने कमावलेल्या पैशांचा उपयोग करताना हृतिक दिसतोय. पंकज त्रिपाठी यांनी साकारलेल्या राजकारणी व्यक्तिरेखेसोबत तो पार्टी करताना दिसतोय.
हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून विशाल दादलानी यांनी गायले आहे. या गाण्याचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अजय -अतुल यांनी दिले आहे. या गाण्याचा ठेका प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या गाण्यात पंकज त्रिपाठी, मृणाल ठाकूर, आदित्य श्रीवास्तव सुद्धा दिसत आहेत. हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.