बॉलीवूडमधील बहुचर्चित असे ‘रईस’ आणि ‘काबिल’ हे दोन चित्रपट या आठवड्यात एकाच दिवशी प्रदर्शित झाले. अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘रईस’ या चित्रपटाची सध्या चर्चा सुरु आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानने अवैधरित्या दारुचा धंदा करणाऱ्या एका गुंडाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, शाहरुखचा अभिनय या महत्त्वाच्या घटकांमुळे ‘रईस’ खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसवरही आपली श्रीमंती सादर करण्यात यशस्वी ठरत असल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे हृतिक रोशनचा ‘काबिल’ हा चित्रपट शाहरुखच्या चित्रपटाला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. शांततेत आयुष्य जगू इच्छिणा-या जोडप्याच्या आयुष्यात अचानक वादळ येते आणि या जोडप्याचे जगचं उध्वस्त करून जाते. येथून सुरू होते, एका सूडाची कहानी. हृतिक रोशने ‘काबिल’मध्ये साकारलेल्या रोहन भटनागरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे.
#Raees Wed 20.42 cr, Thu 26.30 cr, Fri 13.11 cr. Total: ₹ 59.83 cr. India biz… All set for a big Sat and Sun.
— taran adarsh (@taran_adarsh) January 28, 2017
#Kaabil Wed 10.43 cr, Thu 18.67 cr, Fri 9.77 cr. Total: ₹ 38.87 cr. India biz… Biz should witness growth on Sat and Sun.
— taran adarsh (@taran_adarsh) January 28, 2017
आठवड्याच्या मध्यावरच शाहरुखचा ‘रईस’ आणि हृतिकचा ‘काबिल’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांमध्ये ‘काबिल’ची जास्त प्रशंसा केली गेली असली तरी तीन दिवसांची कमाईचा आकडा पाहता बॉक्स ऑफिसवर शाहरुखच वरचढ असल्याचे चित्र आहे. ‘काबिल’च्या तुलनेत ‘रईस’ या चित्रपटाच्या कमाईची चांगलीच सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘रईस’ आणि ‘काबिल’ या दोन्ही चित्रपटांच्या कमाईचा आकडा ट्विट केला आहे. ‘रईस’ने पहिल्या दिवशी २०.४२ कोटी, दुस-या दिवशी २६.३० कोटी, तर तिस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १३.११ कोटींची कमाई केली. तीन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५९.८३ कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. तर ‘रईस’च्या तुलनेत ‘काबिल’ बराच मागे आहे. ‘काबिल’ने पहिल्या दिवशी १०.४३ कोटी, दुस-या दिवशी १८.६७ कोटी, तर तिस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ९.७७ कोटींची कमाई केली. तीन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३८.८७ कोटी रुपये इतकी कमाई केली आहे.
दरम्यान, आता पाकिस्तानमध्येही ‘रईस’ आणि ‘काबिल’ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर तेथे बॉलीवूड चित्रपट दाखविण्यास मनाई करण्यात आली होती. पण, पाकिस्तानमधील चित्रपटगृह मालकांना तेथील लोकल चित्रपटांमुळे फार काही नफा होत नाही. त्यामुळे त्यांना बॉलीवूडपटांवरच अवलंबून राहावे लागते. दरम्यान, तेथील चित्रपटगृह मालकांनी सरकारला भारतीय चित्रपट दाखवू द्यावे अशी विनंती केली आहे. त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी गेल्या आठवड्यात सर्व भागधारकांशी सल्लामसलत करण्याकरिता एक समिती स्थापन केली. या समितीने पंतप्रधान सचिवालयाकडे सदर बंदी उठविण्याची शिफारस केली आहे. पंतप्रधानांची परवानगी मिळताच माहिती मंत्रालय हे भारतीय चित्रपट दाखविण्याची परवानगी असल्याचे पत्रक जाहीर करेल.
शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिची देखील मुख्य भूमिका आहे. तर ‘काबिल’ चित्रपटात हृतिक रोशनची मुख्य भूमिका आहे. हम एन्टरटेंमेन्टची उपकंपनी असलेली हम फिल्म्स हे दोन्ही चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. आम्हाला चित्रपट दाखविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळताच अवघ्या दोन दिवसांमध्ये आम्ही भारतीय चित्रपट दाखविण्यास सुरुवात करू. सर्व काही नीट झालं तर आठवड्याच्या शेवटी आपण चित्रपट बघू शकू, असे हम फिल्म्सच्या अधिका-यांनी म्हटले आहे.