झी टीव्हीवर प्रदर्शित होणारी ‘हम पाँच’ मालिका सर्वांचीच आवडती होती. मालिकेतील प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांचे विशेष प्रेम होते. त्याचबरोबर या मालिकेतून बॉलिवूडला विद्या बालनसारखी अभिनेत्रीही मिळाली. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू झळकवण्यासाठी ही मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मालिकेतील भूमिकांसाठी अनेकांचे ऑडिशन घेतले आणि अखेर निर्माते-दिग्दर्शकांनी मालिकेसाठी काही जणांना निवडले आहे.
मध्यमवर्गीय माथूर कुटुंब आणि त्यातील पाच मुलींची कथा या मालिकेत मांडण्यात आली आहे. ‘हम पाँच फिर से’ असे या मालिकेचे नाव असणार आहे. याच मालिकेतील एक भूमिका निभावणाऱ्या जयश्री व्यंकटरामनन यांनी याविषयी म्हटलं की, ‘ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज आहे. मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार हे नक्की. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या या मालिकेचा मी एक भाग असल्याचा मला आनंद आहे. आजकाल लोकं खूप तणावाच्या वातावरणात राहतात. अशा वेळी हम पाँच फिर से सारखी मालिका लोकांमध्ये हलकं-फुलकं वातावरण ठेवण्यास मदत करेल.’
मागील दोन सिझनप्रमाणे या तिसऱ्या सिझनची निर्मिती एकता कपूर करणार नसून ‘एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स’ याची निर्मिती करणार आहे. यावेळी मालिकेला एक मॉडर्न टच देण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. १९९५ आणि २००५ मध्ये प्रचंड गाजणाऱ्या या मालिकेचं नवीन रूप आता प्रेक्षकांना किती आवडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
‘हम पाँच फिर से’मधील नव्या कलाकारांचे फोटो :
१. अशोर सराफ यांनी साकारलेली आनंद माथूर यांची भूमिका आता अभिनेता सूरज थापर निभावतील.

२. आनंद माथूर यांच्या पहिल्या पत्नीची भूमिका वैष्णवी महंत साकारणार असून पहिल्या सिझनमध्ये प्रिया तेंडुलकरने ही भूमिका बजावली होती.

३. आनंद माथूर यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका सीमा पांडे साकारणार असून याआधीच्या सिझनमध्ये शोमा आनंदने ही भूमिका निभावली होती.

४. काजल भाईची भूमिका जयश्री व्यंकटरामनन साकारताना दिसणार आहे.

५. विद्या बालनने बजावलेली राधिकाची भूमिका आता नव्या सिझनमध्ये अंबालिका सप्रा साकारणार आहे.

