बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलतभावाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय.

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील जंगपुरा भोगल बाजारपेठेत गुरुवारी (७ ऑगस्ट) उशिरा रात्री पार्किंगच्या वादातून हुमा कुरेशीचा चुलतभाऊ आसिफ कुरेशी यांची हत्या करण्यात आली. स्कुटी पार्किंगवरून झालेल्या छोट्या वादाचे रूपांतर आसिफ कुरेशी यांच्या हत्येत झाले.

धारदार शस्त्राने हल्ला करून दोन तरुणांनी त्याचा जीव घेतला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. काही कारणावरून वाद झाल्यानंतर मारेकरी संतापून आसिफवर तुटून पडल्याचे सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे. एका आरोपीच्या हातात धारदार शस्त्र असून, तो हल्ला करीत असल्याचे पाहायला मिळतेय.

आसिफच्या नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा स्कुटी गेटसमोरून हटवून बाजूला लावण्यास सांगितले गेले. घटनेतील सहभागी मुख्य आरोपी गौतम (वय १८) आणि उज्ज्वल (१९) या दोघांनी मिळून आसिफ यांच्यावर हल्ला केला. उज्ज्वलने प्रथम वार केला. त्यानंतर गौतमनेही हल्ला केला. घटनेच्या वेळी उपस्थित जमावाने मध्यस्थीचाही प्रयत्न केला. तसेच, आसिफच्या पत्नीनेही हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आसिफ गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर आसिफ यांना गंभीर अवस्थेत; जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपींनी किरकोळ कारणावरून क्रूरपणे हल्ला केल्याचा आरोप आसिफ यांची पत्नी आणि नातेवाइकांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल लेनमध्ये घडली. हे खून प्रकरण समोर येताच दिल्ली पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. हत्येतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण हल्ल्याचा प्रकार कैद झाला आहे, ज्यात दोन्ही आरोपी आसिफ यांच्यावर शस्त्राने हल्ला करताना स्पष्ट दिसत आहेत.