अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो, अशा प्रकारचे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर वीर दासने स्पष्टीकरण दिले आहे. “मी इथे काम करण्यासाठी आलो आहे आणि यापुढेही ते सुरुच ठेवेन,” असे वीर दास म्हणाला.

वीर दासने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्याविरोधात अनेक तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी प्रतिक्रिया देताना वीर दास म्हणाला की, “मी माझे काम करण्यासाठी इथे आलो आहे आणि यापुढेही ते सुरु ठेवेन. मी थांबणार नाही,” असेही तो म्हणाला.

“माझे काम लोकांना हसवणे आहे. जर तुम्हाला ते विचित्र वाटत असेल तर तुम्ही हसू नका. मी आतापर्यंत कधीही सेन्सरशिपचा सामना केलेला नाही. तसेच लोकांना हसवण्यासाठी त्यांच्यात प्रेम वाढवण्यासाठी भारतात अधिक कॉमेडी क्लबची आवश्यकता आहे,” असेही त्याने यावेळी म्हटले.

आणखी वाचा : “जितक्या टाळ्या वाजल्या, तितकेच चाबकाचे फटके दिले पाहिजे”, वीर दासच्या वक्तव्यावर मुकेश खन्ना संतापले

नेमकं प्रकरण काय?

अलीकडेच वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला आहे. वॉशिंग्टन डीसी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या अलीकडील सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, दासने देशाच्या कथित दुहेरी चारित्र्याबद्दल भाष्य केल्याचे आणि कोविड-१९ महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवरील कारवाई ते शेतकरी निषेध या मुद्द्यांचा उल्लेख केला. त्याची बोलण्याची शैली लोकांना आवडली असली तरी आता त्याला विरोध केला जात आहे.

वीर दासच्या या संपूर्ण व्हिडीओची एक छोटी क्लिप ट्विटरवर शेअर करून लोकांनी त्याला चांगलेच सुनावले आहे. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. “मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे मोजतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आमचा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्‍यांवर धावून जातो,” असे व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “भारतात महिलांची सकाळी पूजा केली जाते आणि रात्री..”; अमेरिकेतल्या वक्तव्यावरुन कॉमेडियन वीर दासचे स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीर दासच्या या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर अनेक जण त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. लोक त्याला अपमानास्पद शब्दांनी ट्रोल करत आहेत आणि त्याला ‘देशद्रोही’ म्हणत आहेत.