गेल्या काही दशकांपासून बॉलीवूडवर मेगास्टार अमिताभ बच्चन यांचेच वर्चस्व पाहायला मिळतेय. आजवर त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांवर छाप पाडलेली आहे. या दिग्गज अभिनेत्याला एखादी भूमिका करणं आव्हानात्मक वाटत असेल असं आपल्याला कधीच वाटणार नाही. पण आजही आपण एखादा शॉट देताना तसेच बेचैन होतो जसे चार दशकांपूर्वी व्हायचो असे अमिताभ यांचे म्हणणे आहे. आजही या ७३ वर्षीय अभिनेत्यावर चांगले काम करण्याचा दबाव असतो.
अमिताभ बच्चन म्हणाले की, प्रत्येक चित्रपट हा माझ्यासाठी एक परिक्षा असतो. पिंक हा चित्रपट त्यातीलच एक आहे. आजही शॉट देण्यापूर्वी मला रात्रीची झोप येत नाही, बेचैन झाल्यासारखे वाटते आणि मला असचं राहायचं आहे. आयुष्यात काहीच सहज मिळत नाही. अगदी यशस्वी चित्रपटसुद्धा सहज मिळत नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अमिताभ बच्चन यांनी पिंक चित्रपटात वकिलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात समाजात आपल्या हक्कासाठी लढणा-या तीन मुलींची कथा चित्रीत करण्यात आलेली आहे.
पिंक चित्रपटात मुख्य भूमिका सोडून वेगळी अशी सहायक भूमिका साकारणे किती कठीण होते असा प्रश्न विचारला असता अमिताभ म्हणाले की, ही तुमची विचारसरणी आहे जी समजून घेण्याची गरज आहे. प्रत्येक कलाकाराची याविषयी एक धारणा असते. मला काम करायचे आहे आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मला काम मिळतेय. अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरीक्त पिंक चित्रपटात तापसी पन्नू, क्रिती कुल्हारी, अंगद बेदी, पियुष मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन अनिरुद्ध रॉय चौधरी याने केले आहे.