India Pakistan Match Marathi Singer Shares Video : आशिया कपच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आणि दणदणीत विजय मिळवला. क्रिकेटप्रेमींसाठी भारत-पाकिस्तान सामना नेहमीच विशेष मानला जातो. पण, पहलगाम हल्ल्यानंतर मे महिन्यात दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला होता. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांचा सामना होत असल्याने हा सामना होऊ नये, असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं; पण अखेर हा सामना झालाच.
१४ सप्टेंबर रोजी झालेला भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना होऊ नये, यासाठी राजकीय क्षेत्रातून विरोध केला गेला. अशातच त्यावर लोकप्रिय मराठी गायक मंगेश बोरगांवकरनंही व्हिडीओ शेअर करीत त्याचं म्हणणं मांडलं. मॅच झाल्यानं किंवा न झाल्यानं तसेच आपण ती बघितल्यानं किंवा न बघितल्यानं काहीच फरक पडणार नसल्याचं मत त्यानं व्यक्त केलं. त्याऐवजी आपण आपल्या प्रमुख गरजा आणि मागण्यांसाठी एकत्र येणं गरजेचं असल्याचं त्यानं म्हटलं.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मंगेश म्हणतो, “भारत-पाकिस्तान मॅचबद्दल समाजात दोन गट पडले आहेत. कोणी म्हणतंय काही हरकत नाही, मॅच तर आहे… तर काही जण म्हणत आहेत, नाही आपण बोललो होतो की, पाकिस्तानबरोबर कसलेच संबंध ठेवायचे नाहीत आणि अशा रीतीनं आपण आपल्यातच भांडतो आहोत. ज्यांनी ही मॅच ठरवली. त्याचं नियोजन केलं. ते लोक तर तिथे लाइव्ह मॅच पाहत आहेत. त्यामुळे विनाकारण आपण एकमेकांमध्ये भांडून काय उपयोग आहे?”
त्यानंतर तो सांगतो, “आपलं काय चुकतंय, तर आपण कुठल्याही राजकारण्यांचे चाहते होतोय. भाजपा असो… काँग्रेस असो… किंवा कोणताही पक्ष असो… आपण त्यांचे चाहते का होत आहोत? आपण त्यांना आपलं काम करून देण्यासाठी निवडून दिलं आहे. ते आपले सेवक आहेत. मग आपण त्यांचे चाहते का होत आहोत. जेव्हा सेवक तुमचे देव बनतात, तुम्ही त्यांना गुरू मानायला लागता, तेव्हा हेच होणार आहे. तुमचा-आमचा विचार होणारच नाही. आपलं काय झालंय ना? आपण कुणाचे तरी भक्त झालो आहोत. काँग्रेस असो, भाजपा असो किंवा आणखी कोणी… हे करून कधीच भलं होणार नाही.”
पुढे मंगेश म्हणतो, “जात-धर्म-पंथ या गोष्टी आता संपल्या आहेत, हाताबाहेर गेल्या आहेत. त्यात तुम्ही काही करू शकणार नाही. आता तुम्ही रस्ते, वीज किंवा तुमच्या प्राथमिक गरजांसाठी एकत्र येऊ शकता. कारण- अजून आपण तिथेच आहोत. वीज, पाणी, रस्ते, ट्रॅफिक यांवरच आहोत अजून आपण… त्यासाठी जेव्हा आपण एकत्र येऊ, मग ते कोणतंही सरकार असो… आज भाजपाचं आहे. उद्या कोणी काँग्रेसचं असेल किंवा आणखी कुणाचंही असेल. मी कोणाच्याी बाजूनं बोलत नाहीय.”
नंतर मंगेश सांगतो, “आपण नागरिक म्हणून एकत्र येत नाही आहोत, त्यामुळे आपण हे सगळं भोगत आहोत. आपण आवश्यक गोष्टीसाठी एकत्र नाही आलो; तर नागरिक म्हणून आपल्याला ज्या गोष्टी नकोत, त्या घडणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की, आपण आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला बेसिक गोष्टी शिकवणं गरजेचं आहे, त्यांना नागरिक म्हणून काय करायचं? आपल्या मागण्या काय आहेत? त्या पूर्ण कशा करायच्या? कुठल्या तरी खोट्या आश्वासनांना, पैशांना, भुलथापांना बळी पडायचं नाहीय. समाज म्हणून आपण एकत्र असणं गरजेचं आहे. ते होत नाहीय, म्हणून आपण सर्व पात्र नसलेल्या गोष्टी भोगत आहोत.”
पुढे मंगेश म्हणतो, “आपण कितीतरी कर भरत आहोत. कुठल्याच गोष्टीत आपण समाधानी नाही, मग उपयोग काय? आणि जात-धर्म-पंथ आता कामाला येणार नाहीत. त्यांचा काही उपयोग नाही. सगळे एकत्र राहिले, तरच काहीतरी घडणार आहे. मॅच न बघितल्यानं काय होणार आहे मला सांगा… तुम्ही मॅच बघणार नाही, मग ते कोणत्या तरी हॉटेलमध्ये दाखवतील, त्यावर बंदी घाला वगैरे मागणी केली गेली. अरे, पण त्यांचा व्यवसाय आहे तो… ते भारतातील आपलेच लोक आहेत. उद्या तुमचं किंवा माझं हॉटेल असेल आणि ते कोणी असं बंद केलं तर जमेल का? ज्यांनी हा मॅच खेळण्याचा निर्णय घेतला आहे, तर इथला व्यवसाय बंद करण्याची काय गरज आहे?”
पुढे मंगेशने सांगितलं, “तुम्ही मॅच बघून किंवा न बघून काय होणार आहे? तुम्ही निषेध केला, काय फरक पडणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन, हुशारीनं डोकं वापरून, काय चाललंय आणि आपल्याबरोबर कसं राजकीयरीत्या खेळलं जातंय हे लक्षात घेतलं पाहिजे. आपलं ध्येय, उद्दिष्ट पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. तेच करून घेणं गरजेचं आहे. कारण- आता ते कोणी करणार नाही. हे नाही केलं, तर मग समाजात जे सुरू आहे तेच पुढेही सुरू राहणार. समाजात दुफळी निर्माण होणं, हेच सत्ताधारी किंवा राजकारण्यांना हवं असतं. आपणच आपल्यात भांडणं, आपणच आपल्यात मरणं हेच त्यांना हवं असतं. त्यामुळे विचार करा.”