India’s Got Latent Host Samay Raina : समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमुळे काही महिन्यांपूर्वीच मोठा वाद निर्माण झाला होता. या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने सहभागी स्पर्धकाला विचारलेल्या एका आक्षेपार्ह प्रश्नामुळे त्याच्यासह आयोजकांविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
स्टँडअप कॉमेडियन समय रैना, रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखीजा या सगळ्यांनी यानंतर सोशल मीडियावर जाहीर माफी देखील मागितली होती. याशिवाय समयने त्याच्या युट्यूब चॅनेलवरील ‘इंडिया गॉट लेटेंट’ शोचे सगळे व्हिडीओ डिलीट केले होते. आता या सगळ्या वादानंतर काही दिवसांपूर्वीच रणवीरने पुन्हा एकदा त्याचा पॉडकास्ट सुरू केला. याशिवाय अपूर्वा सुद्धा तिच्या कामात व्यग्र झाली. यादरम्यान, समय प्रेक्षकांसमोर केव्हा येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
अखेर समय रैनाने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लवकरच पुनरागमन करत असल्याचं जाहीर केलं आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील वादानंतर हळुहळू समय रैनाचं आयुष्य पुन्हा एकदा रुळावर येत आहे. मंगळवारी मुंबईत ‘जुनून’ या वेब सीरीजच्या स्क्रिनिंग सोहळ्याला समय उपस्थित होता. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोच्या वादानंतर समय पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला होता. यावेळी पापाराझींनी त्याला शोबद्दल प्रश्न विचारला.
पापाराझींनी समयला, “भाई शो पुन्हा कधी सुरू होणार?” असा प्रश्न विचारला. यावर तो “अरे…”, असं म्हणून केवळ हसला आणि त्यानंतर पापाराझींसमोरून निघून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
आता समय लवकरच पुनरागमन करणार असून, तो युरोप, यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. हा दौरा ५ जून रोजी कोलनमध्ये सुरू होईल आणि २० जुलैला सिडनी येथे संपेल.
नेमकं प्रकरण काय होतं?
समय रैना होस्ट असलेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाला. रणवीर अलाहाबादियासह कार्यक्रमाचा होस्ट समय रैना, आशीष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मखीजा यांच्या विरोधात अनेक पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या. शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देणे आणि अश्लील चर्चा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.