बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान आज आपल्यात नसला तरी त्याच्या सिनेमांच्या आणि अभिनयाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या मनात कायम अजरामर आहे. इऱफान खानने त्याच्या दमदार अभिनय कौशल्याने चाहत्यांची मनं जिकंली होती. विविध भूमिका साकारत त्याने अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. इरफान खानच्या जाण्यानं बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं. मात्र आता इरफानच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. लवकरच इरफान खानचा आतापर्यंत रिलीज न झालेला एक सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
इरफान खानचा २००५ सालामधील ‘दुबई रिटर्न’ हा सिनेमा वांद्रे फेस्टिव्हलमध्ये रिलीज होणार आहे. २००५ सालात इंटरनॅशलन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं होतं. मात्र हा सिनेमा त्यानंतर सिनेगृहांमध्ये प्रदर्शित झाला नाही. आदित्य भट्टाचार्य यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा एक कॉमेडी फिल्म असून या सिनेमात इरफान खानने एका गँगस्टरची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफान खानचा ओटीटीवर रिलीज झालेला शेवटचा सिनेमा ठरला होता. या सिनेमात इरफानसोबत राधिका मदान, करीना कपूर और दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत झळकले होते.
यंदाच्या वर्षीच बांद्रा फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच BFF ची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता अभय देओल आणि चित्रपट समीक्षक असीम छाबडा या फेस्टिव्हलच्या समितीत सहभागी झाले आहेत. दरम्यान या फिल्म फेस्टिव्हलमध्ये इरफान खानचा ‘दुबई रिटर्न’ सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा इरफान खानला पडद्यावर भेटण्याची संधी मिळणार आहे.