अभिनेता इरफान खान यांचं गेल्या वर्षी कॅन्सर या आजाराने निधन झालं. त्यांचा मुलगा बाबिल आपल्या वडिलांबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे तो कायम चर्चेतही असतो. आताही तो चर्चेत आला आहे. पण या मागचं कारण त्याची सोशल मीडिया पोस्ट नसून त्याचा आगामी चित्रपट हे आहे.
इरफान खान यांचा मुलगा बाबिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकतंच त्याच्या या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. ‘क्वाला’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव असणार आहे. बाबिलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयी माहिती दिली आहे. त्याने या चित्रपटातला त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. त्याचसोबत चित्रपटाचा टीझरही त्याने शेअर केला आहे.
आणखी वाचाः वडिलांच्या आठवणीत इरफान खानच्या मुलाला स्टेजवरच कोसळले रडू
या चित्रपटाचं चित्रीकरण बर्फाळ प्रदेशातलं असल्याचं टीझरवरुन लक्षात येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अन्विता दत्त यांचं असून यात बाबिलसोबत तृप्ती डिमरी आणि स्वस्तिका मुखर्जी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट आपल्या आईच्या प्रेमासाठी तरसलेल्या मुलीची कथा आहे. या चित्रपटाबद्दल याव्यतिरिक्त अधिक खुलासा अद्याप झालेला नाही. या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
View this post on Instagram
बाबिलच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होतीच. आता हा टीझर शेअर करुन बाबिलने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं त्याने सोशल मीडियावर आपल्या मैत्रिणीसोबतचा फोटो शेअर करत सांगितलं आहे.
आणखी वाचाः बाबिलने वडील इरफान खान यांचे कपडे परिधान करुन स्विकारले पुरस्कार, म्हणाला मी ही..
या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती संस्था क्लीन स्लेट फिल्मची असणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. अभिनेत्री तृप्ती डिमरीचा अनुष्का शर्मासोबतचा हा दुसरा चित्रपट असेल. याआधी ‘बुलबुल’ या चित्रपटात तिने काम केलं आहे.