बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. विशेष म्हणजे आज झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यनचा जामीन नाकारण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस आर्यनचा मुक्काम पुढील काही दिवस आर्थर रोड जेलमध्येच राहणार आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर बॉलिवूडसह अनेक दिग्गजांनी शाहरुखला पाठिंबा दिला होता. जर गेल्या १७ दिवसांच्या तुरुंगवासानंतरही आर्यनला जामीन मिळाला नाही तर ती त्याच्यासाठी अनावश्यक शिक्षा ठरेल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ फौजदारी वकील माजिद मेमन यांनी दिली.

आर्यन खानला जामीन नाकारल्यामुळे त्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आर्यन खानला जामीन नाकारल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकंतच वरिष्ठ फौजदारी वकिल माजिद मेमन यांनी यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे.

“येत्या काही दिवसात आर्यनला जामीन मिळायला हवा. माझ्या दृष्टीने त्याच्याविरोधात ड्रग्जचे सेवन करणे आणि त्यादिवशी पार्टीला उपस्थित राहणे याशिवाय आर्यनवर कोणतेही आरोप नाहीत. त्यामुळे जर १७ दिवसांच्या तुरुंगवासानंतर आर्यनला जामीन मिळाला नाही तर त्या आरोपीला अनावश्यक त्रास आणि शिक्षा दिल्यासारखे होईल,” असे वरिष्ठ फौजदारी वकिल माजिद मेमन म्हणाले.

“व्हॉटसअ‍ॅप चॅटमुळे आर्यनच्या अडचणी वाढू शकतात का?”

एनसीबीकडून सातत्याने आर्यनच्या जामीन देण्यावर विरोध केला जात आहे. आतापर्यंत एनसीबीने आर्यनविरोधात केलेले सर्व युक्तीवाद हे व्हॉट्सअॅप चॅटच्या दाव्यावर करण्यात आले आहेत. आर्यनने अरबाज मर्चेंट आणि ड्रग्ज पेडलरसोबत ड्रग्जबद्दल चर्चा मारल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकरणावरुन प्रसारमाध्यमांनी व्हॉट्सअॅप चॅट हा पुरावा न्यायालयात किती प्रभावी असू शकतो? त्यामुळे आर्यन खान अडकू शकतो का? असा प्रश्न माजिद मेमन यांना विचारला होता.

त्यावेळी ते म्हणाले, “अजिबात नाही. व्हॉट्सअॅप चॅटवरील कथित संभाषणामुळे कोणतीही परिस्थिती बिघडत नाही. कारण याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे आर्यन हा एक प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. तो पुराव्याशी छेडछाड करू शकतो, असा दावा करणे चुकीचे आहे.” असेही त्यांनी स्पष्ट केले.