Isha Koppikar On South Industry : मॉडेलिंग क्षेत्रापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
ईशा कोप्पीकरची ‘क्या कूल हैं हम’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चा झाली. २००५ साली आलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं बॉलीवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण करण्यापूर्वी साऊथ फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावलं होतं.
साऊथकडील चित्रपटांमध्ये काम करून तिनं तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ईशानं अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, एका दिग्दर्शकाने तिचा सर्वांसमोर अपमान केला होता. कारण- त्यावेळी ईशाला डान्स कसा करायचा हे माहीत नव्हतं.
ईशा कोप्पीकरनं २००० मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिला चित्रपट ‘फिजा’ होता, ज्यामध्ये तिची छोटी भूमिका होती. करीना कपूर आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होते.
दक्षिणेकडील चित्रपटाच्या सेटवर काम करण्याचा अनुभव खूप वाईट होता. त्याबद्दल ईशा कोप्पीकरनं ‘डिजिटल कमेंटरी’ला सांगितलं, “साउथ चित्रपटाच्या सेटवर माझा अपमान झाला होता. तेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली होती. हे बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीचं आहे. जेव्हा मी सेटवर होते तेव्हा खूप डान्स होता. साऊथकडचे डान्स सोपे नसतात. त्या कोरिओग्राफरनं मला सर्वांसमोर सांगितलं की, या मुली बॉलीवूडमधून येतात. त्यांना काहीही माहीत नसतं. मला कळत नाही की, यांना घेतातच का. जर तुला डान्स कसे करायचे हे माहीत नसेल, तर तू इथे का आलीस?”
ईशा कोप्पीकर पुढे म्हणाली, “त्या कोरिओग्राफरचे बोलणं ऐकून मी रडू लागले. हे सर्व ऐकून मला खूप वाईट वाटले. मला अपमानास्पद वाटलं. मी माझ्या मेकअप रूममध्ये परत जाऊन रडले; पण मी ते आव्हान म्हणून स्वीकारलं. मी स्वतःला सांगितलं की, पुढच्या वेळी जेव्हा मी साऊथमध्ये येईन तेव्हा मी डान्स शिकेन आणि पुन्हा कोणालाही माझ्याशी असं बोलू देणार नाही.”
सरोज खान यांच्या असिस्टंटकडून डान्स शिकली
त्यानंतर ईशा कोप्पीकरने सरोज खानच्या असिस्टंट डान्सरशी संपर्क साधला आणि नंतर प्रशिक्षण घेतले. तिने घरी सरोज खान यांची कोरिओग्राफी शिकण्यास सुरुवात केली आणि नंतर ‘खल्लास’ हे गाणे केले. त्या गाण्याने ईशा कोप्पीकरला रातोरात स्टार बनवले. ईशाने आणखी बरेच चित्रपट आणि गाणी केली; पण आजही लोक तिला ‘खल्लास गर्ल’, असे म्हणतात.
ईशा कोप्पीकर तीन वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर आहे; परंतु २०२४ मध्ये ती एका दाक्षिणात्य चित्रपटात दिसली. ती ‘एलान’ या तमीळ चित्रपटात दिसली होती. त्याशिवाय तिने ‘दहनम’ व ‘फिक्सर’ या वेब सीरिजही केल्या आहेत.