ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज त्यांच्या उत्कृष्ट अभिनय, तसेच नृत्य व अभिव्यक्ती यांसाठी ओळखल्या जातात. आज त्या चित्रपटांमध्ये काम करीत नसल्या तरी एक काळ असा होता, जेव्हा त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या जुन्या किश्शांमुळे त्या अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात येतात.
आता त्यांनी शम्मी कपूर यांच्याबरोबरच्या त्यांच्या शेवटच्या भेटीबद्दल सांगितले आहे. त्यांनी त्याबाबत वेदना आणि दुःख व्यक्त केले आहे. अभिनेत्रीने सांगितले की, ते खूप आजारी होते. त्यांच्या अत्यंत बिघडलेल्या वाईट शारीरिक अवस्थेतही त्यांच्या हातात दारूचा ग्लास होता. त्यांना प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असायचा.
खरं तर मुमताज यांनी नुकताच ‘रेडिओ नशा’शी संवाद साधला. त्यादरम्यान त्यांनी शम्मी कपूरबरोबरच्या त्यांच्या शेवटच्या भेटीबद्दल सांगितले. अभिनेत्रीने सांगितले की, एक वेळ अशी होती जेव्हा शम्मी कपूर यांनी त्यांना प्रपोज केले होते. त्यांच्या शेवटच्या वाढदिवसाची आठवण करून देताना मुमताज म्हणाल्या की, ते खूप आजारी होते. तो त्यांचा शेवटचा वाढदिवस होता. शम्मी कपूर यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पत्नीने मुमताज यांना आमंत्रित केले होते. मुमताज यांनी ते आमंत्रण स्वीकारले आणि त्या अभिनेत्री आशा पटेलबरोबर तिथे पोहोचल्या.
मुमताज यांनी सांगितले की, ते खुर्चीवर बसून दारू पीत होते. त्यांनी शम्मी कपूर यांना दूरवरून विचारले होते की, ते आजारी आहेत तरी का दारू पीत आहेत? मग त्यांना कळले की, ते जास्त काळ जगणार नाहीत. मुमताज म्हणाल्या की, शम्मी कपूर यांना आनंदी राहायचे होते म्हणून त्या जास्त काही बोलल्या नाहीत. अभिनेत्री त्यांच्याबरोबर थोडा वेळ बसल्या आणि नंतर त्यांना स्वतःची काळजी घेण्यास सांगितले. मुमताज म्हणाल्या की, त्यांचा मृत्यू होताना पाहून खूप दुःख झाले.
मुमताज शम्मी कपूर यांचे कौतुक करीत म्हणाल्या, “ते एक चांगले माणूस होते, मस्तीखोर होते, सुंदर होते.” अभिनेत्री म्हणाल्या की, जर त्यांना हवे असते, तर ते अनेक महिलांशी संबंध ठेवू शकले असते. पण, ते तसे नव्हते, ते खूप चांगले होते. अभिनयाबरोबरच शम्मी कपूर त्यांच्या चांगल्या लूकमुळेही खूप चर्चेत होते.