jackie shroff says action keeps him strong and energetic : जॅकी श्रॉफ हे अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी त्यांच्या सिनेमॅटिक कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ते प्रमुख भूमिकांसह सहाय्यक भूमिकांमध्येही त्यांच्या अभिनय कौशल्याने चमकताना दिसले आहेत. येत्या काळात जॅकी धमाल करणार आहेत.
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ वयाच्या ६८ व्या वर्षीही स्वतःला तरुण मानतात. ‘हंटर 2 : टूटेगा नहीं, तोड़ेगा’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी अॅक्शन सीन्स केले आहेत, त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत.
शुक्रवारी जॅकी श्रॉफ यांनी ‘हंटर 2 : टूटेगा नहीं, तोड़ेगा’ या वेब सीरिजच्या ट्रेलर लाँच इव्हेंटला हजेरी लावली. यावेळी अभिनेत्याने अॅक्शन सीन्स करतानाचा अनुभव सांगितला.
अभिनेत्याने सांगितले की, “अॅक्शनदरम्यान माझे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले होते, तसेच अनेक दुखापती झाल्या होत्या. पण, देवाच्या कृपेने मी आणखी मजबूत झालो आहे. माझे मन मला १९ वर्षांच्या मुलासारखे वाटते आणि शरीर अजूनही तरुण वाटते.”
सीरिजमधील अॅक्शन सीनबद्दल बोलताना, त्यांनी सुनील शेट्टीला एकदा अॅक्शन सीन करताना दुखापत झाल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की कोणीतरी चुकून सुनीलच्या फासळ्यांवर लाकडाचा तुकडा मारला होता. अभिनेता म्हणाला, “माझ्या घोट्यालाही दुखापत झाली होती आणि माझ्या डाव्या हाताचा स्नायूही फाटला होता. पण, हे सर्व आमच्या कामाचा एक भाग होता. अॅक्शन ही अशी गोष्ट आहे, जी आपल्याला तंदुरुस्त ठेवते.”
जॅकी श्रॉफ फिटनेसबद्दल काय म्हणाले?
फिटनेसवर भर देताना जॅकी म्हणाले की, आजकाल आपण सर्व जण आपल्या फोनमध्ये इतके व्यग्र झालो आहोत की आपली हाडे कडक झाली आहेत. आपण आपल्या आरोग्याची तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांची, जसे की पालक आणि जवळच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. मी या सीरिजमध्ये खूप कमी अॅक्शन सीन्स केले आहेत, परंतु सुनील शेट्टीने माझ्यापेक्षा जास्त अॅक्शन सीन्स केले आहेत.जॅकी आणि सुनील यांच्याबरोबर, या सीरिजमध्ये अनुषा दांडेकर, बरखा बिष्ट, अनंग देसाई, प्रमोद पाठक आणि मजेल व्यास यांच्याही भूमिका आहेत.
प्रिन्स धीमान आणि आलोक बत्रा दिग्दर्शित ‘हंटर २’ ही सीरिज २४ जुलै २०२५ पासून अमेझॉन एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा पहिला सीझन २०२३ मध्ये आला होता. त्यात जॅकी श्रॉफ यांनी छोटी भूमिका साकारली होती.
जॅकी श्रॉफ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट शनिवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर अनुपम खेर, शुभांगी दत्त, इयान ग्लेन, बोमन इराणी, जॅकी श्रॉफ, अरविंद स्वामी, पल्लवी जोशी आणि नासेर यांसारखे कलाकार आहेत.