मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित करणारा चित्रपट म्हणजे ‘सैराट’. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून ‘आर्ची’ आणि ‘परशा’ची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. महाराष्ट्रातील करमाळ्यात खुललेली ही प्रेमकहाणी अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. या चित्रपटाची विक्रमी वाटचाल पाहता निर्माता दिग्दर्शक करण जोहरने हिंदीतही ‘सैराट’चा रिमेक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने तयारीही सुरु केली असून, अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खत्तर या चित्रपटातून मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘सैराट’चा हिंदी रिमेक म्हटल्यावर त्यातील गाणी, चित्रपटाचे नाव या साऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिल्याचे पाहायला मिळाले. हीच उत्सुकता पाहता आता या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आल्याचे म्हटले जातेय. ‘बॉलिवूड हंगामा’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘धडक’ या नावाने सैराटचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांक खैतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. प्रेमासाठी समाज आणि कुटुंबाचा विरोध पत्करणाऱ्या प्रेमी युगुलांचा खडतर प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’मधून ऑनर किलिंगचा मुद्दा अधोरेखित करत महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेडेगावात बहरलेल्या प्रेमकथेचा आधार घेतला होता. ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्येही असेच कथानक साकारण्यात येणार असून, महाराष्ट्राऐवजी राजस्थानातील एका छोट्याशा खेड्यात आकारास आलेले कथानक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या जान्हवी आणि ईशान दोघेही या चित्रपटाच्या दृष्टीने तयारी करत असून, जान्हवीने त्यासाठी अभिनय कार्यशांळांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा ‘सैराट’ जोडीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ईशान आणि जान्हवीचा प्रेक्षक स्वीकार करतील का, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.