scorecardresearch

“जॅकला वाचवता आलं नसतंच कारण…”; टायटॅनिकला २५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर दिग्दर्शकाचा खुलासा

टायटॅनिकला २५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर दिग्दर्शकाने जॅकला का वाचवता आलं नसतं? याबाबतचे कारण सांगितलं आहे.

“जॅकला वाचवता आलं नसतंच कारण…”; टायटॅनिकला २५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर दिग्दर्शकाचा खुलासा
टायटॅनिक प्रेमींमध्ये सुरुवातीपासूनच, या चित्रपटातील एका घटनेवरुन खूप चर्चा केली जाते. ती म्हणजे चित्रपटाच्या शेवटी जॅक स्वतःला वाचवू शकला असता का? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जॅक आणि रोझच्या प्रेमकथेमुळे लोकप्रिय ठरलेल्या टायटॅनिक या चित्रपटाला १९ डिसेंबर २०२२ रोजी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. जेम्स कॅमरुनने दिग्दर्शित केलेल्या हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. ज्यामध्ये लिओनार्दो दी कॅप्रिओ आणि केट विन्सलेट यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे.

टायटॅनिक प्रेमींमध्ये, सुरुवातीपासूनच, या चित्रपटातील एका घटनेवरुन खूप चर्चा केली जाते. ती घटना म्हणजे चित्रपटाच्या शेवटी जॅक स्वतःला वाचवू शकला असता का आणि तो रोझ असलेल्या लाकडी फळीवर जाऊ शकला असता का? सिनेमातील या दृश्यावरुन उपस्थित झालेल्या चर्चा आणि प्रश्नांनंतर जेम्सने एका वैज्ञानिक सिद्धांताद्वारे हे सिद्ध केलं आहे की, त्यावेळी जॅकला वाचवता आले नसतेच.

हेही वाचा- “आता भगव्या रंगाची ब्रा…” दीपिकाच्या बिकिनी वादावर मराठमोळ्या स्मिता गोंदकरची बोल्ड प्रतिक्रिया

जॅकला वाचवता आलं असतं का?

जेम्स कॅमरुनचा ब्लॉकबस्टर टायटॅनिक रिलीज होऊन २५ वर्षे झाली असली तरी आजही या चित्रपटाबाबत चर्चा सुरु असते. शिवाय सर्वात जास्त चर्चा आणि वादविवाद सुरु असतात ते म्हणजे या चित्रपटाच्या शेवटी झालेला जॅकचा मृत्यू. पाण्यात तरंगणाऱ्या लाकडी फळीचा त्याग करुन आपल्या प्रिय रोझला वाचवताना जॅकचा मृत्यू होतो. मात्र, अनेकांना अजूनही असे वाटते की, ज्या लाकडी फळीवर रोझ होती त्या फळीवर भरपूर जागा होती. ती जागा जॅक आणि रोझने शेअर केली असती तर तो स्वतःला वाचवू शकला असता.

हेही वाचा- विश्लेषण : आता ‘अवतार २’, ‘पठाण’सारखे चित्रपट ICE Theatre मध्ये पाहता येणार! काय आहे हे तंत्रज्ञान?

मात्र, या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरुनने आता त्यावेळी जॅकला वाचवता आलं नसतं हे वैज्ञानिक अभ्यासाद्वारे सिद्ध केलं आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर विथ पोस्टमीडिया’साठी दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जेम्सने सांगितले की, ‘आम्ही या संपूर्ण गोष्टीला विश्रांती देण्यासाठी वैज्ञानिक अभ्यास केला. शिवाय जॅक आणि रोझ दोघेही लाकडी फळीवर एकत्र बसू शकत नाहीत हे सिद्ध करण्यासाठी एक विशेष प्रोजेक्ट तयार केला होता.’

तसंच जेम्सने पोर्टलला सांगितलं की, ‘आम्ही हायपोथर्मिया तज्ज्ञासोबत सखोल फॉरेन्सिक विश्लेषण केलं. त्यानुसार आम्ही दोन लोकांना घेतलं जे केट आणि लिओच्या शरीराचे वजनाचे होते. आम्ही त्यांच्या आत सेन्सर लावले आणि त्यांना बर्फाच्या पाण्यात ठेवले. शिवाय आम्ही विविध पद्धतींनी ते जगू शकले असते की नाही? हे तपासलं असता एक उत्तर मिळालं ते म्हणजे नाही. असं केल्याने दोघेही जगू शकले नसते कोणीतरी एकच जगू शकला असता’

हेही वाचा- ‘पठाण’च्या वादादरम्यान शाहरुख खानचा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देतानाचा व्हिडीओ व्हायरल; प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते “तुझ्या आईने…”

दरम्यान, आता टायटॅनिक रिलीज होऊन २५ वर्षांनंतर जेम्सला जॅकचा शेवट ज्या प्रकारे झाला त्याबद्दल पश्चात्ताप झाला का? असा प्रश्न विचारला असता त्याने उत्तर दिलं, ‘नाही, कारण जॅरला मरण्याची गरज होती. हे प्रकरण रोमियो आणि ज्युलिएटसारखे आहे. शिवाय हा चित्रपट म्हणजे प्रेम आणि त्याग आणि मृत्यूबद्दलचा आहे आणि प्रेमाचे मोजमाप त्यागातून होते.’ तसंच टायटॅनिक पुढील फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्यात येणार आहे. जॅकच्या मृत्यूबद्दल जेम्सचा सायन्स शो नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे कदाचित मला २५ वर्षांनंतर या वादाला सामोरं जावं लागणार नाही असंही जेम्स म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 20:00 IST

संबंधित बातम्या