बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांचं आणि पापाराझींचं काय नातं आहे? देवास ठाऊक… जया बच्चन अनेकदा पापाराझींवर संतापल्याचं पाहायला मिळालं आहे. पापाराझींवर चिडलेल्या जया बच्चन रागानं लालबुंद होतात आणि त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतात. नेहमीच कुणा ना कुणावर रागावणाऱ्या जया बच्चन यांचा आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

अलीकडेच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका शर्बानी मुखर्जी यांचे वडील व राणी मुखर्जी-काजोल यांचे काका रोनो मुखर्जी यांचे निधन झाले. मंगळवारी (३ जून) त्यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. जया बच्चन त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदाबरोबर तेथे गेल्या. पण, पापाराझीला पाहून त्यांना राग आला. त्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

मंगळवारी (३ जून) जया बच्चन मुंबईतील मुखर्जी निवासस्थानी झालेल्या दिवंगत चित्रपट निर्माते रोनो मुखर्जी यांच्या प्रार्थना सभेला उपस्थित राहिल्या. या प्रसंगी बॉलीवूडमधील अनेक प्रतिष्ठित चित्रपट घराण्यांचे सदस्य श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते.

रोनो मुखर्जी यांचे २८ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी ‘हैवान’ (१९७७) आणि ‘तू ही मेरी जिंदगी’ (१९६५) यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते. ते प्रसिद्ध मुखर्जी बंधूंपैकी सर्वांत मोठे होते. त्यांचे भाऊ देब मुखर्जी यांचेही त्यांच्या मृत्यूच्या काही महिने आधी निधन झाले.

प्रार्थना सभेचे वातावरण गंभीर होते; पण जया बच्चन त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदाबरोबर प्रार्थना सभेतून बाहेर पडत असताना एक घटना घडली. मीडिया आणि पापाराझींवर नाराज झालेल्या जया बच्चन छायाचित्रकारांना रागात म्हणाल्या, “चला… तुम्ही पण या… या. हे सर्व चुकीचे… घाणेरडे.” त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की, त्या या गोष्टीने खूश नाही.

जेव्हा श्वेताने त्यांना गाडीत बसण्यास मदत केली तेव्हा जया पुन्हा एका पापाराझीवर ओरडल्या आणि म्हणाल्या, “या गाडीत बसा….” जया बच्चन यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक सेलिब्रिटी प्रार्थना सभेला उपस्थित

काजोल, तनिषा मुखर्जी, अयान मुखर्जी, अमित कुमार व सलीम खान यांच्यासह अनेक जवळचे कुटुंबीय आणि उद्योगातील दिग्गज प्रार्थना सभेला उपस्थित होते. रोनो मुखर्जी यांचे अंत्यसंस्कार सांताक्रूझ हिंदू स्मशानभूमीत झाले, जिथे त्यांचा मुलगा सम्राटने कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले.