शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जर्सी’ चित्रपटाचं प्रदर्शन करोनाचा वाढता प्रभाव पाहता पुढे ढकलण्याता आलं आहे. हा चित्रपट ३१ डिसेंबर २०२१ ला प्रदर्शित होणार होता. पण मुंबई आणि दिल्लीमधील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यानं चित्रपटगृहं बंद करण्यात आली आहेत. आता प्रदर्शनाची नवी तारीख अद्याप समजलेली नाही. अशातच आता या चित्रपटातील अभिनेत्री मृणाल ठाकूरलाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मृणालनं स्वतःच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मृणाल ठाकूरची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मृणालनं याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. तिला फार थोड्या प्रमाणात करोनाची लक्षणं जाणवत होती. त्यामुळे तिने करोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वतःला घरीच आयसोलेट केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये मृणालनं सांगितलं की, ‘मी ठीक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे. करोना नियमांचं पालन करत आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत त्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्या आणि स्वतःची काळजी घ्या.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मृणाल ठाकूर मागच्या काही दिवसांमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. अलिकडेच तिने बिग बॉस १५च्या मंचावरही हजेरी लावली होती. त्यावेळी शाहिद आणि सलमान यांच्यासोबत ती धम्माल करताना दिसली होती. दरम्यान मृणाल ठाकूर आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूरचे वडील पंकज कपूरही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.