आज आम्ही अशा अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने आपल्या अभिनयाने आणि दमदार विनोदाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या कलाकाराने सगळ्यांना आपले वेड लावले आहे. प्रसिद्धीबरोबरच त्याने भरपूर संपत्तीही कमावली आहे.

आज त्याच्याकडे सर्व सुखसोयी आहेत. हा कलाकार कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. तो रस्त्यावर पेन विकून उदरनिर्वाह करत असे. तर चला जाणून घेऊया त्या कलाकाराबद्दल.

आम्ही अभिनेते आणि कॉमेडियन जॉनी लिव्हर यांच्याबद्दल बोलत आहोत. जॉनी यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे. जॉनी लिव्हर आज (१४ ऑगस्ट) त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जॉनी लिव्हर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील कानिगिरी येथे झाला. बॉलीवूडमध्ये नाव कमावण्यापूर्वी जॉनी यांना खूप संघर्ष करावा लागला होता. आर्थिक अडचणींमुळे ते सातवीनंतर शिक्षण सुरू ठेवू शकले नाही आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते छोटी-मोठी कामे करू लागले. एकेकाळी ते रस्त्यावर पेन विकायचे आणि यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता.

जॉनी लिव्हर यांनी लहानपणीच रस्त्यावर पेन विकताना मिमिक्री करायला सुरुवात केली. नंतर हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये काम करताना ते चित्रपटातील कलाकारांची नक्कल करायचे. इथेच त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि बॉसने त्यांचे नाव ‘जॉनी लिव्हर’ ठेवले, जे त्यांच्या कारकिर्दीची ओळख बनले. जॉनी लिव्हर हे भारतातील पहिल्या स्टँड-अप कॉमेडियनपैकी एक मानले जातात. स्टेज शोदरम्यान अभिनेता सुनील दत्तने त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना ‘दर्द का रिश्ता’ या चित्रपटात संधी दिली. त्यानंतर जॉनी यांनी मागे वळून पाहिले नाही.

जॉनी लिव्हर यांचे करिअर

जॉनी लिव्हर यांच्या कारकिर्दीचा एक अद्भुत विक्रम असा आहे की, १९९२ ते २००० पर्यंत त्यांचे सलग आठ वर्षांत १२० चित्रपट प्रदर्शित झाले, म्हणजेच दरमहा सरासरी एकापेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये ‘खिलाडी’, ‘बाजीगर’, ‘करण अर्जुन’, ‘जीत’ आणि ‘जुदाई’सारखे सुपरहिट चित्रपट समाविष्ट आहेत. बॉलीवूडमधील मोठे स्टारदेखील त्यांच्या कॉमेडी टायमिंग आणि मिमिक्रीची कबुली देतात.

जॉनी लिव्हर यांची एकूण संपत्ती किती?

सध्या जॉनी लिव्हर यांची एकूण संपत्ती सुमारे २२४ कोटी रुपये आहे. त्यांच्या कमाईचा मोठा भाग जगभरातील होणाऱ्या लाईव्ह शो आणि चित्रपटांमधून येतो. ते दरवर्षी सुमारे १२ कोटी रुपये कमावतात. याशिवाय त्यांनी रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. मुंबईत त्यांचा ३ बीएचके फ्लॅट, एक आलिशान व्हिला आणि इतर अनेक मालमत्ता आहेत. त्यांच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये सुमारे १ कोटी रुपये किमतीची ऑडी क्यू७ देखील समाविष्ट आहे. आजही जॉनी लिव्हर चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत आणि लवकरच ते ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘लंतरानी’मध्ये दिसणार आहेत.