एकेकाळी बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या सलमान खानच्या सिक्वलच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक डेविड धवन हे मुलगा वरुण धवनला घेऊन प्रेक्षकांसमोर एका नव्या रुपात येणार आहेत. सलमानचा हिट चित्रपट असलेल्या जुडवा चित्रपटाचा सिक्वल येत असून या चित्रपटाचे शीर्षक जुडवा २ असे ठेवण्यात आले आहे. यात सलमानने साकारलेली भूमिका वरुण धवन साकारणार आहे. वरुणची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘जुडवा २’ चित्रपटामध्ये ‘पिंक’ चित्रटातील अभिनेत्री तापसी पन्नू आणि जॅकलीन फर्नांडीस यांची वर्णी लागली आहे. चित्रपटात शुद्ध सज्जन शंभर नंबरी वरुन कोणासोबत दिसणार? आणि टपोरी अंदाजातला वरुण कोणासोबत रोमान्स करणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या पहिल्या दिवशी अभिनेता वरुण धवन, दिग्दर्शक डेविड धवन आणि निर्माता साजिद नादियादवाला यांनी सलमानसोबतच्या पहिल्या चित्रपटावेळीच्या चित्रिकरणाला उजाळा दिला.
सलमान खान अभिनित ‘जुडवा’ चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी वरुण धवन अवघ्या सात वर्षाचा होता. त्यावेळी तो सलमानला ‘अंकल’ असे म्हणायचा. सलमानला ‘अंकल’ म्हटल्याचे अजिबात रुचत नव्हते, अशी आठवण वरुणने यावेळी करुन दिली. ‘अंकल’ म्हटल्यामुळे वरुणला सलमानने चांगलाच डोस दिल्याचा किस्सा त्याने शेअर केला. सलमानच्या ‘जुडवा’ चित्रपटाच्या प्रिमियरला मी जेव्हा सलमान खानला ‘अंकल’ म्हणून बोलावले तेव्हा त्याचा राग अनावर झाला होता. पुन्हा मला ‘अंकल’ म्हणालास तर कानफाडीत लगावेन, अशी धमकी सलमानने दिल्याचे वरुणने यावेळी सांगितले. यापुढे ‘अंकल’ असे म्हटल्यास चित्रपट पाहण्यासाठी प्रवेश देणार नाही, अशी धमकी देत यापुढे अंकल म्हटलेस तर तुझ्या डॅडींचा चित्रपट असला तरी तुला प्रवेश मिळणार नाही, असे सलमान खान म्हणाला होता. त्यानंतर मी त्याला भाई असे म्हणायला लागलो, असे वरुणने सांगितले.
‘जुडवा २’ या चित्रपटाविषयी बोलताना डेविड धवन म्हणाले की, जुडवा चित्रपटाच्या सिक्वलचे कथानक हे पहिल्या चित्रपटापेक्षा वेगळ असणार आहे. पहिल्या चित्रपटामधील व्यक्तिरेखांची नावे आणि गाणी वगळता चित्रपट पूर्णपणे वेगळा असणार आहे. साजिद यांनी देखील सलमान खानच्या ‘जुडवा’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटाला मिळालेले यश माझ्या कारकिर्दीतील पहिले मोठे यश होते, असे ते म्हणाले. १९९७ ला प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा डेविड धवन यांनीच केले होते. डेविड धवन आणि वरुण धवन यांचा आगामी चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. आपल्या मुलाच्या चित्रपटामध्ये ट्विस्ट आणण्यासाठी या पहिल्या चित्रपटातील अर्थात जुडवामधील जोडी म्हणजेच सलमान खान आणि करिश्मा पाहुण्या कलाकाराच्या रुपात दिसणार अल्याची देखील चर्चा आहे.