Malvika Raaj Welcomes Baby Girl : २००१ साली आलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात अभिनेत्री मालविका राज हिने पूजाची भूमिका साकारली होती. या अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली. मालविका आई झाली असून तिच्या घरी चिमुरडीचे आगमन झाले आहे. या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
मालविका राजने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे “गुलाबी धनुष्य, लहान बोटे आणि प्रेम. या जगात स्वागत आहे बेबी गर्ल. २३.०८.२०२५.” मालविकाने काही महिन्यांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती.
१० वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न केले
मालविका राज आणि प्रणव बग्गा यांनी दहा वर्षे डेटिंग केल्यानंतर २९ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न केले. त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय यावेळी उपस्थित होते आणि गोव्यात त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग झाले. या वर्षी मे महिन्यात या जोडप्याने एका जबरदस्त फोटोशूटचे फोटो शेअर करून गरोदरपणाची घोषणा केली. आता दोघेही एका मुलीचे पालक झाले आहेत. अद्याप त्यांनी या मुलीचे नाव काय ठेवले हे जाहीर केलेले नाही. लेकीसाठी त्यांनी #babybagga असा हॅशटॅग वापरला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताच त्यांच्यावर मित्र, कुटुंबीय आणि चाहत्यांकडून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
मालविका राज आणि प्रणव बग्गा पालक झाल्याची बातमी ऐकताच चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल यांनी लिहिले- ‘अभिनंदन.’ गायिका बिस्मिल यांनी कमेंट केली- ‘मी खूप आनंदी आहे, तुम्हा दोघांचेही अभिनंदन.’ याशिवाय चाहते रेड हार्ट कमेंट करून मालविका आणि प्रणव यांचे अभिनंदन करत आहेत.
मालविका राजची कारकीर्द
मालविका राज ही बॉबी राज आणि रीना राज यांची मुलगी आहे. मालविकाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली. मालविका राजने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात करीना कपूरच्या लहानपणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले होते. तिने हिंदी तसेच तेलुगू चित्रपट ‘जयदेव’ (२०१७) मध्ये काम केले. त्यानंतर मालविका ‘स्क्वॉड’ (२०२१) या हिंदी ॲक्शन चित्रपटातही दिसली. त्यानंतर २०२४ मध्ये मालविकाने MX Player च्या ‘स्वाइप क्राइम’ या क्राइम थ्रिलर सीरिजमध्ये काम केले आहे.