बॉलिवूड अभिनेत्री काजोलनं एकेकाळी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टी गाजवली आहे. आजही काजोलचा अभिनय तेवढाच दमदार आहे. चित्रपटांनंतर आता काजोल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. पण ज्या वेब सीरिजसाठी काजोलला विचारणा करण्यात आली आहे ती वेबसीरिज खूपच बोल्ड सीनसाठी प्रसिद्ध आहे. नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजचा पहिला भाग २०१८ मध्ये आला होता. आता या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागासाठी निर्मात्यांनी काजोलला विचारणा केली आहे असं बोललं जातंय.
‘लस्ट स्टोरीज’ वेब सीरिजमध्ये चार वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. या वेब सीरिजमध्ये राधिका आपटे, भूमी पेडणेकर, नील भूपलम, मनीषा कोइराला, संजय कपूर, जयदीप अहलावत, नेहा धूपिया, विक्की कौशल, कियारा आडवाणी आणि आकाश ठोसर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. वेब सीरिजमधील बोल्ड सीन आणि कथेनं प्रेक्षकांना हैराण केलं होतं. या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात जर कजोल दिसली तर ती एखाद्या बोल्ड भूमिकेत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या ओटीटी पदार्पणाबद्दल पिंकव्हिलाशी बोलताना काजोल म्हणाली, “ओटीटीचं महत्त्व आता खूपच वाढलंय. ९० च्या दशकात चित्रपटगृह हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा एकमेव मार्ग होता. त्यामुळे चित्रपट हिट व्हायचे. पण आता चित्र बदललं आहे. ओटीटी अनेक कलाकारांना स्वतःची क्षमता आणि अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी दिली आहे. अनेक कलाकार यामुळे यशस्वी झाले आहेत.”
आणखी वाचा- “मला कधीही सिनेसृष्टीत यायचे नव्हते त्याऐवजी…”; ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर काजोलने केला खुलासा
काजोल पुढे म्हणाली, “आता कलाकरांसाठी ही उत्तम वेळ आहे कारण त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. प्रत्येकाकडे खूप चांगल्या भूमिका आहेत आणि खूप काम आहे. ओटीटीने अनेक दमदार कलाकार आपल्याला दिले आहे. ही याची सर्वात चांगली बाजू आहे असं मला वाटतं. आज २४ इंचांची कंबर किंवा चित्रपटात काम करण्यासाठी गरजेची असलेली आकर्षक शरीरयष्टी नसेलेल्या अभिनेत्री देखील स्टार होत आहेत कारण या गोष्टींचा आता फारसा फरक पडत नाही. त्यांचा अभिनय बोलतो. ते त्यांच्या कौशल्यामुळे स्टार होतात.”