सातत्याने बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा सतत चर्चेत असतो. मध्यंतरी त्याने आमिर खानच्या चित्रपटाबद्दल विखारी शब्दांत टीका केली होती. मंगळवारी (३० ऑगस्ट) रोजी त्याला वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल काही वादग्रस्त ट्विट केआरकेने केलं होतं. ट्विटप्रकरणी खान याला पोलिसांनी गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावरून अटक केली होती. मात्र नंतर त्याला कनिष्ठ न्यायालयाने जामीन देऊन त्याची सुटका केली आहे.
तुरुंगातून बाहेर येताच तो पुन्हा एकदा सोशल माध्यमांवर सक्रिय झाला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याने एक पोस्ट शेअर केली आहे, ‘मी १० दिवस तुरुंगात होतो तेव्हा फक्त पाण्यावर जगलो होतो. त्यामुळे मी १० किलो वजन कमी केले आहे.’ त्याच्या या विधानावर नेटकऱ्यांनी मात्र त्याला चांगलेच धारेवर धरले आहे. एकाने लिहले आहे की, वैद्यकीयदृष्ट्या हे कसे शक्य आहे? प्रचंड श्रम करून आणि फक्त पाणी पिऊनही, १० दिवसांत १० किलो वजन कमी करणे अशक्य आहे. दुसर्याने लिहिले: “इथून आणखी १० किलो स्नायू गमावण्याची कल्पना करा”. एकीने लिहले आहे की ‘१० दिवसात १० किलो वजन कमी झाले तुम्हाला जर २ महिने तुरुंगात ठेवले तर तुम्ही अमर व्हाल’.
केआरकेला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या होत्या. इतकंच नव्हे तर केआरकेबाबत अनेक मीम्स देखील व्हायरल झाले होते. केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती पण त्यानंतर काही तासांमध्येच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एएनआयच्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री केआरकेच्या छातीमध्ये अचानक दुखू लागलं. त्यानंतर त्याला लगेचच कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं.
कमाल खानने २०२० मध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाशी संबंधित अपमानास्पद ट्विट केलं होतं. इरफानच्या निधनानंतर केआरकेने त्याच्याविषयी वादग्रस्त ट्विट केलं. इरफान निर्मात्यांना नावं ठेवायचा असा आरोप ट्विटच्या माध्यमातून केआरकेने केला होता. ऋषि कपूर यांच्या बाबतीतही केआरकेने अशीच अपमानजनक ट्विट केल्याचे दाखले मध्यंतरी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.