‘बेबी डॉल’ या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली गायिका कनिका कपूर सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. लंडहून परतलेल्या कनिकाला करोना विषाणूची लागण झाली. मात्र ही बातमी तिने इतरांपासून लपवून ठेवली. यामुळे तिच्यावर आता जोरदार टीका केली जात आहे. अगदी बॉलिवूड अभिनेता कमाल खानने तर तिच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. “करोना विषाणू पसरवणाऱ्या कनिकावर बॉलिवूडने बहिष्कार टाकावा.” असं म्हणत कमालने आपला संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाला कमाल खान?

“संपूर्ण बॉलिवूडने कनिका कपूरवर बहिष्कार टाकावा. भविष्यात तिला कुठल्याच निर्मात्याने काम देऊ नये. आपण सर्वांनी समाजाच्या हितासाठी जबाबदार असले पाहिजे. आपण कनिकावर बहिष्कार टाकूया कारण ती या समाजाची शत्रू आहे.” असं ट्विट कमाल खान उर्फ केआरकेने केले आहे. आवाक् करणारी बाब म्हणजे त्याने कनिकाला पाठिंबा देणाऱ्या नेहा धुपिया आणि सोनम कपूरवरही निशाणा साधला आहे.

“सोनम कपूर विषकन्या कनिकाला पाठिंबा देत आहे. तिच्या सोबत नेहा धुपिया देखील आहे. या दोघी पृथ्वीवरील सर्वात मुर्ख मुली आहेत. त्या वाईट अभिनेत्री तर आहेतच शिवाय माणूस म्हणून देखील त्या वाईट आहेत.” असं म्हणत केआरकेने कनिकाला पाठिंबा देणाऱ्या नेहा आणि सोनमवर टीका केली आहे.

कमाल खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो आपली मते रोखठोकपणे मांडताना दिसतो. यावेळी त्याने कनिका कपूरवर निशाणा साधला आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.