भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कामसूत्र थ्रीडी’ चित्रपटाच्या ‘टूडी’ स्वरूपातील ट्रेलर प्लेबॉय कव्हरगर्ल आणि चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री शर्लीन चोप्रा, मिलिंद गुणाजी आणि दिग्दर्शक रुपेश पॉल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
रुपेश पॉल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट वात्सायनाच्या कामसूत्रावर आधारीत आहे. शाररिक संबंधातील प्रेम भावना आणि कामुकता या विषयावर भाष्य करणे अद्याप आपल्या समाजात वर्जित मानले जाते. अशा विषयावर ‘थ्रीडी’ स्वरूपातील चित्रपट बनविण्याचे धाडस दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी केले आहे.
कामसूत्रात सांगितलेल्या प्रणय आणि शृंगारावर हा चित्रपट भाष्य करतो. प्रणयामुळे शरीर, मन आणि आत्म्यामध्ये कशाप्रकारे बदल होतात हे चित्रपटात दर्शविले असून, प्रणय हा केवळ दोन शरीराचे मिलन नसून दोन पवित्र आत्म्यांचे मिलन देखील आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कामसूत्र या ग्रंथात सांगितलेला काळ उभा करण्यासाठी तशा प्रकारच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे.
२०१३ च्या ‘कान चित्रपट महोत्सवात’ चांगली कामगिरी केलेल्या या चित्रपटाने अमेरिका, युरोप आणि अशियातील वितरणाच्या अधिकाराद्वारे मोठ्या प्रमाणावर कमाई केली.
‘आरपीपीएल’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात शर्लीन चोप्रा काम देवीच्या भूमिकेत, तर मिलिंद गुणाजी पराक्रमी राजाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी स्वत: लिहिली आहे.